पुणे : पुण्यातील वास्तुविशारद (आकिटेक्ट) महेश नामपूरकर यांच्या वास्तुकला व भूदृश्यकला (लँडस्केप) क्षेत्रातील कार्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. पंतप्रधानांनी नामपूरकर यांना पत्र पाठवून प्रशंसा केली असून, त्यात त्यांच्या समाजोपयोगी, शाश्वत आणि पर्यावरणपूरक वास्तू संकल्पनांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदींनी नामपूरकर यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, की तुम्ही राष्ट्र उभारणीत दिलेले योगदान आणि जागतिक पातळीवर उमटविलेली नाममुद्रा याबद्दल तुमचे कौतुक आहे. वास्तुकला आणि भूदृश्यकला क्षेत्रातील तुमचे कार्य दूरदृष्टीचे आहे. त्याचा भारतातील तरुण मनांवर विशेष प्रभाव पडत आहे. भारतीय कलाकार, शिल्पकार यांना तुम्ही पाठबळ देत आहात. देशाला हरित बनविण्यात तुम्ही योगदान देत आहेत. या कार्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन. तुमच्या पुढील सर्जनशील वाटचालीस माझ्या शुभेच्छा. भविष्यात तुम्ही असेच कार्य करीत राहाल, अशी आशा आहे.
अभिमानास्पद बाब
पंतप्रधानांच्या या पत्रावर नामपूरकर यांनी भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, देशाच्या सर्वोच्च पदावरून मिळालेला हा सन्मान केवळ वैयक्तिक नसून, महाराष्ट्रातील वास्तुविशारद समुदायासाठीही अभिमानास्पद आहे. वास्तुकलेद्वारे राष्ट्रसेवेला नवे बळ देणारा हा सन्मान आहे. पंतप्रधानांकडून मिळालेले हे प्रशंसापत्र मला अधिक जबाबदारीने, प्रामाणिकपणे आणि समर्पण भावनेने देशासाठी कार्य करण्याची नवी ऊर्जा देणारे आहे.
महेश नामपूरकर हे सुमनशिल्प या संस्थेचे भागीदार असून, वास्तुकला, अंतर्गत सजावट (इंटीरियर) आणि भूदृश्यकला या क्षेत्रात त्यांना २५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. आपल्या या व्यावसायिक प्रवासात त्यांनी अनेक आव्हाने व महत्त्वाचे टप्पे यशस्वीपणे पार केले आहेत. त्यांनी ५ हजार चौरस फुटांपासून ते ४०० एकरांपर्यंतच्या प्रकल्पांवर काम केले आहे.
माजी राष्ट्रपतींपासून अमिताभ बच्चनपर्यंत
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासाठी नामपूरकर यांनी काम केले आहे. याचबरोबर महानायक अमिताभ बच्चन, दिवंगत अभिनेते धर्मेंद्र, ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यासारख्या दिग्गज कलाकारांसाठी ही त्यांनी वास्तुविशारद म्हणून काम केलेले आहे. त्यांना आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. हैदराबाद मधील रामोजी फिल्म सिटी, खोपोलीतील ॲडलॅब्स इमॅजिका आणि पुण्यातील सनीज् वर्ल्ड या प्रकल्पांसाठीही त्यांनी काम केले आहे. याचबरोबर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.

