बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन नोव्हेंबर रोजी बारामतीत येणार असून, विद्या प्रतिष्ठानच्या परिसरातील प्रेरणास्थळाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. आचारसंहितेमुळे यापूर्वी पुढे ढकलण्यात आलेला हा कार्यक्रम खासदार सुप्रिया सुळे तसेच संबंधित मंत्र्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर निश्चित झाल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.

बारामतीत गोविंदबाग येथे पत्रकार परिषदेत पवार यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘या कार्यक्रमात विद्या प्रतिष्ठानच्या परिसरातील गौतम बुद्धांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. तसेच राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णा भाऊ साठे, यशवंतराव चव्हाण आणि शारदाबाई पवार यांच्या चित्रांचा प्रेरणास्थळात समावेश आहे. पंतप्रधानांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. मोठ्या कंपन्यांचे प्रमुख, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि विविध फाउंडेशनच्या प्रतिनिधींनाही निमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपक्रम आणि विद्यार्थ्यांशी संवाद होणार आहे.’

दुष्काळावर राजकारण नको

‘दुष्काळी भागाच्या दौऱ्यात नागरिकांकडून चारा आणि पाण्याची मागणी होत आहे. सरकारने दुष्काळी परिस्थितीत राजकारण न करता संकटग्रस्तांना तातडीने मदत करावी,’ असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. या परिस्थितीबाबत अस्वस्थ असून, नागरिकांच्या मागण्यांची नोंद घेत असल्याचे त्यांनी सांगितले. उजनी धरणातील कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रकल्पाचीही अधिकाऱ्यांकडून माहिती घेणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी बंडखोरी केली असली तरी मी त्यावर बोलणार नाही. पुरंदरमधील आमच्या पक्षाचे काही लोक त्यांच्याबरोबर आहेत. परंतु सहकारातील निवडणूक पक्ष लढत नाही. राजकीय पक्षाच्या निवडणुका आणि सहकाराच्या निवडणुका वेगवेगळ्या असतात. त्यामुळे अशा निवडणुकीमध्ये हे घडत असते. – खासदार सुप्रिया सुळे