कर्नाटकमध्ये ४०० महिलांवर बलात्कार करणाऱ्या रवण्णाचा प्रचार पंतप्रधानांनी केला. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांवर काहीबाही बोलून अपमान करतात. मोदी यांनी राजकारणाची चेष्टा चालवली आहे. मात्र, ते देशावर बोलत नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रहार केला.

पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी एसएसपीएमएसच्या मैदानावर आयोजित सभेत गांधी बोलत होते. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, रजनी पाटील, आमदार डॉ. विश्वजित कदम, माजी आमदार अनंत गाडगीळ, नसीम खान, मोहन जोशी, चंद्रकांत हांडोरे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, संग्राम थोपटे आदी या वेळी उपस्थित होते. गांधी यांना शिंदे पगडी परिधान करण्यात आली.

राज्यघटना वाचवण्याची लढाई असल्याचे सांगून गांधी म्हणाले, की काँग्रेस, इंडिया आघाडी घटना वाचवत आहेत. मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राज्यघटना संपवत आहे. राज्यघटना संपवल्यास मागासवर्गीय, अल्पसंख्यांकांना मिळणारे अधिकार हिरावले जातील. राज्यघटना नष्ट केल्यास देशाची ओळख राहणार नाही. मात्र, डॉ़. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांनी जे देशाला दिले, ते संपवू देणार नाही. भाजपचे नेते कधी राज्यघटना बदलणार म्हणतात, कधी आरक्षण संपवणार म्हणतात. आरक्षणाची ५० टक्क्यांची ही कृत्रिम अट आम्ही काढून टाकणार. देशात १५ टक्के दलित, ८ टक्के आदिवासी, ५० टक्के मागासवर्गीय आहेत. उद्योगपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज मोदी सरकारने माफ केले. युपीए सरकारने कर्जमाफी केली होती. २४ वर्षांचा मनरेगाचा पैसा, २४ वर्षांच्या कर्जमाफीचा पैसा २२ उद्योगपतींना देण्यात आला. खासगी क्षेत्रात मागास, अल्पसंख्यांकांचा सहभाग नाही. ते मनरेगा, मजुरी करताना दिसतील. समाजातील ९० टक्के समाजाकडे काही नाही. त्यामुळे आम्ही ९० टक्क्यांचे सरकार चालवणार आहोत.

हेही वाचा >>> राहुल गांधींच्या सभेला गर्दी; स्टेशन परिसरातील वाहतूक विस्कळित

देशात जातनिहाय सर्वेक्षण केले जाणार आहे. प्रत्येक संस्थेत कोण कुठल्या जातीचे आहे हे कळेल. जातनिहाय जनगणना हे क्रांतिकारक पाऊल. त्यानंतर जनता जागरूक होईल आणि राजकारण बदलेल. मी जातनिहाय जनगणनेचा विषय काढल्यावर मोदी स्वतःला ‘मी ओबीसी’ म्हणू लागले. सार्वजनिक क्षेत्र खासगी करून टाकले. खासगीकरण प्रचंड होत आहे. आधीच सैन्य, रेल्वेमध्ये नोकऱ्या मिळायच्या. पण आता अग्निवीर योजनेमुळे पेन्शनवाला आणि बिगरपेन्शनवाला असे सैनिकांचे दोन प्रकार झाले. करोडो तरुणांना मोदींनी बेरोजगार केले. चुकीच्या पद्धतीने लागू केलेला जीएसटी बदलला जाणार आहे. त्यामुळे देशात केवळ एकच कर असेल. मोदी शेतकऱ्यांकडून कर घेतात. २२ लोकांना दिलेला पैसा गरीब, शेतकऱ्यांना आम्ही देणार आहोत. देश हलवून टाकणारे काम करणार आहोत, असे गांधी यांनी नमूद केले.

हेही वाचा >>> बारामती बँकेतून ५०० रुपयांच्या नोटा गायब, रोहित पवारांचा गंभीर आरोप

देशातील प्रत्येक गरिबाची यादी तयार करून प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला दरवर्षी एक लाख रुपये दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी, हमीभाव मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कर्जमाफी आयोगाची निर्मिती केली जाणार आहे. देशातील तरुणांसाठी पहिली नोकरी पक्की योजना राबवली जाणार आहे. त्यात प्रत्येक पदवीधराला एक वर्षाची ॲप्रेंटिस करता येणार आहे. त्यासाठी दरमहा ८५०० रुपये वेतन मिळणार आहे. ही नोकरी खासगी कंपन्या, सरकारी आस्थापनांमध्ये करता येईल. पेपर फोडणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल. तसेच खासगी कंपन्यांना परीक्षा घेता येणार नाही, असे गांधी यांनी सांगितले.

रोखे घेणाऱ्यांची नावे का दडवली?

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे बेकायदा ठरवले. मोदी यांना राजकारण स्वच्छ करायचे होते, तर रोखे घेणाऱ्यांची नावे का दडवली? देशासमोर मोदी भ्रष्टाचार करत आहेत. देशात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर नसाताना लस तयार करणारी कंपनी मोदींना पैसे देत होती, अशी टीकाही त्यांनी केली.