पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक सन्मानाने पुरस्काराने गौरवण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि टिळक परिवारातील सदस्य उपस्थित होते. तेव्हा बोलताना एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, “ब्रिटिशांविरोधात लढताना ज्यांच्या शब्दांच्या धार येत असे, अशा लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळत आहे. त्यानिमित्त मी त्यांचं अभिनंदन करतो. इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, मनमोहन सिंग आणि शरद पवार यांचाही या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.”

“लोकमान्य टिळक सामन्य माणसाच्या मनातील भावना अचूक ओळखत होते. आजच्या काळात समाजातील सामान्य माणसाचे मन ओळखणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्तरावरील नेते बनले आहेत. बाळ गंगाधर टिळक हे आपल्या कर्तृत्वाने लोकमान्य झाले होते. गेल्या ९ वर्षात पंतप्रधान मोदींनी देशासाठी केलेल्या कामांना लोकमान्यता मिळाली आहे. टिळकांनी स्वराज्यासाठी लढा दिला. पण, स्वातंत्र्यानंतर स्वराज्याचे सुराज्यकरण्यामध्ये किती यश आलं, आपल्या सर्वांना माहिती आहे,” असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

“पंतप्रधान मोदींनी देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वासचा नारा देऊन सुराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्यांच्या कार्याची पोचपावती या राष्ट्रीय सन्मानाने होत आहे,” असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.