पुणे : अल्पसंख्याक समाजातील तरुण-तरुणींना रोजगारक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान विकास योजना सुरू केली आहे. या अंतर्गत मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन व पारशी समाजातील तरुणांना कौशल्यविकास प्रशिक्षण देण्याचे पाऊल भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) उचलले आहे. तरुणांना ब्रॉडबँड नेटवर्क टेक्निशियन आणि वायरलेस नेटवर्क टेक्निशियनचे प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव देण्यात येणार आहे. यामुळे या तरुणांना भविष्यात रोजगार उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे, या प्रशिक्षण कालावधीत तरुणांना दरमहा विद्यावेतन दिले जाणार आहे.
केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्या पंतप्रधान विकास योजनेअंतर्गत ‘बीएसएनएल’ने हा कौशल्य विकास उपक्रम सुरू केला आहे. यात अल्पसंख्याक समाजातील तरुण-तरुणींना मोफत दूरसंचार कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण ३० विद्यार्थ्यांच्या तुकडीमध्ये देण्यात येईल. यात प्रत्यक्ष शिकवणी सत्रांसह अनुभवाधारित शिक्षणाचा समावेश असेल. या प्रशिक्षणाचा कालावधी ६०० तासांहून अधिक असून, त्यात तीन महिने प्रशिक्षण आणि १ महिना प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाचा समावेश आहे. ‘बीएसएनएल’चे झोनल टेलिकॉम प्रशिक्षण केंद्र (शाहूनगर, चिंचवड) येथे हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या प्रशिक्षणामध्ये ब्रॉडबँड नेटवर्क तंत्रज्ञ व वायरलेस नेटवर्क तंत्रज्ञ या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पात्र प्रशिक्षणार्थींना दरमहा दोन हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. त्यांच्यासाठी वसतिगृहाची आणि भोजनाची व्यवस्था सशुल्क केली जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर टेलिकॉम सेक्टर स्कील कौन्सिलचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन व पारशी समाजातील १८ ते ४५ वर्षे वयोगटातील तरुण या योजनेत पात्र ठरणार आहेत.
अल्पसंख्याक समाजातील तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. बारावी उत्तीर्ण तरुण तसेच पदवी, पदव्युत्तर, अभियांत्रिकी, डिप्लोमा व पॉलिटेक्निकचे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व दिव्यांग उमेदवारांसाठीही मर्यादित जागा उपलब्ध आहेत. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी दूरध्वनी क्रमांक ९४०३१२८३८८, ९४२५८००९७८ किंवा ९४२५८००७९३ येथे संपर्क साधावा, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी दिली.
योजनेची वैशिष्ट्ये
-मोफत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम
-अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर टेलिकॉम सेक्टर स्किल कौन्सिलचे अधिकृत प्रमाणपत्र
-दरमहा दोन हजार रुपये विद्यावेतन
-प्रत्यक्ष शिकवणी सत्रे
-प्रात्यक्षिके
-कामाचा प्रत्यक्ष अनुभव
-नोकरीच्या दृष्टिकोनातून दूरसंचार कौशल्य प्रशिक्षण
-वसतिगृह व भोजनाची व्यवस्था सशुल्क
