पुणे : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व खासगी कंपन्या, माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणि खासगी आस्थापनांनी सुरक्षिततेच्या आणि सतर्कतेच्या दृष्टीने पुढील दोन दिवस कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याची सवलत द्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुणे जिल्ह्यातील पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्याअनुषंगाने पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील पाच तालुके वगळता अन्य ठिकाणच्या सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने खासगी कंपन्या, कार्यालये, संस्थांनीही कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची सवलत द्यावी, अशी सूचना महापालिकेने केली आहे. सर्व खासगी कंपन्या, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, संस्था, खासगी आस्थापनांनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या आणि सतर्कतेच्या तसेच गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुढील दोन दिवस अधिनस्थ कर्मचारी वर्गाला घरातून काम करण्याची सवलत द्यावी, असे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या सूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे.