पुणे : महापालिकेच्या अर्थसंकल्पात ‘सशक्त महिला-सक्षम समाज’ या संकल्पनेवर भर देताना महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत. यामध्ये महिलांच्या नावावरील मिळकतींना ५० टक्के मिळकत करमाफी, महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र कन्व्हेन्शन सेंटर, शाळेतील मुलींसाठी ‘पिंक रुम’ तसेच महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी प्रशिक्षण योजना राबविल्या जाणार आहेत.

महिलांच्या नावावरील मिळकतींना ५० टक्के मिळकत करमाफी देण्याच्या योजनेमुळे महिलांच्या नावावर मालमत्ता नोंदणी वाढण्यास चालना मिळणार आहे. तसेच, महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार असून येथे महिला उद्योजक, बचत गट आणि विविध क्षेत्रातील महिलांसाठी प्रशिक्षण, कार्यशाळा, प्रदर्शन आणि संवाद कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजनेची पुनर्रचना करण्यात येणार आहे. यामध्ये कौटुंबिक सल्ला, कायदेशीर मार्गदर्शन आणि समुपदेशन सेवा देण्यात येणार आहेत. तसेच महिलांमध्ये आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची भावना वाढीस लागावी यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्र सुरू करून ज्युदो, कराटे, लाठी-काठी, योगासने यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. बचत गटांद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कौशल्य विकास, उद्योजकता प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी आणि कायमस्वरुपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.

व्यवसाय प्रशिक्षण, दहावी-बारावीतील विद्यार्थिनींसाठी खासगी शिकवण्या, सीईटी परीक्षेसाठी अर्थसाह्य, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी अनुदान, मुलगी दत्तक योजना, रमाई स्वावलंबन योजना, संजय गांधी निराधार योजना आणि इंदिरा गांधी विधवा निवृत्तीवेतन योजना यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

पुणे महापालिका हद्दीतील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनांच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकातील महिला वर्गांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

डिजिटल समुपदेशन आणि मार्गदर्शन

किशोरवयीन मुलींच्या आरोग्य आणि मानसिक सक्षमीकरणासाठी महापालिकेच्या ७५ शाळांमध्ये ‘तीची हक्काची जागा’ या संकल्पनेअंतर्गत ‘पिंक रूम’ विकसित करण्यात येणार आहेत. या माध्यमातून डिजिटल समुपदेशन आणि मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. महिलांच्या सुरक्षितता आणि सन्मानाच्या दृष्टीने शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी १०० अद्ययावत आणि स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी केली जाणार आहे.