पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील घनकचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेने शंभर किलोहून (बल्क वेस्ट जनरेटर्स) अधिक कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांचे सर्वेक्षण करून नोंदणीवर भर दिला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होणारा परिसर, गृहनिर्माण सोसायट्या, बाजारपेठ, मंडई परिसरात जनजागृती करण्यात येत आहे.
शहरातील गृहसंकुले, हॉटेल, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, कार्यालये, व्यावसायिक आस्थापना, तसेच मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या अन्य संस्थांपर्यंत जाऊन नोंदणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत महापालिकेचे कर्मचारी नागरिकांशी संवाद साधत आहेत. विविध व्यापारी संकुले, आस्थापनांना भेट देऊन घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमांची माहिती देत आहेत. त्यामुळे घरोघरी भेट देणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना नागरिकांनी आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
चार प्रकारात वर्गीकरण
कचऱ्याचे ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजी योग्य कचरा अशा चार प्रकारांत योग्य वर्गीकरण करणे आवश्यक आहे. ओल्या कचऱ्यावर संबंधित परिसरातच प्रक्रिया करून त्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन करण्यावरही महापालिकेने भर दिला आहे.
नोंदणी आवश्यक
शंभर किलोहून (बल्क वेस्ट जनरेटर्स) अधिक कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी https://swm.cpcb.gov.in/register या संकेतस्थळाचा वापर करावा. नोंदणी प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी तसेच संबंधित आस्थापनांची माहिती संकलित करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी प्रत्यक्ष भेटी देत आहेत.
शहरातील कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी केवळ महापालिकेची नाही. प्रत्येक नागरिक आणि आस्थापनाची आहे. कचऱ्याचे वर्गीकरण आणि त्यावर योग्य प्रक्रिया करण्याची सवय सर्वांनी अंगीकारणे गरजेचे आहे. जास्त कचरा निर्माण करणाऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले. निर्माण होण्याच्या ठिकाणीच कचऱ्याचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे. जास्त कचरा निर्माण करणाऱ्यांनी वर्गीकरण, प्रक्रिया आणि नोंदणी या तिन्ही बाबींना प्राधान्य द्यावे. कचरा योग्य पद्धतीने हाताळला, नाही तर त्याचा आरोग्य आणि पर्यावरणावर परिणाम होतो. कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. आस्थापनांचे सर्वेक्षण करून नोंणीसाठी स्वतंत्र संस्थेचीही नियुक्ती केली जाणार असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.
