पुणे : ‘पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासह गेल्या वर्षीच्या पालखी सोहळ्याप्रमाणे सुरक्षित, अपघातमुक्त, स्वच्छ आणि हरित वारी करण्यासाठी विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे,’ अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली.
आषाढी वारीच्या पूर्वतयारीचा आढावा डाॅ. पुलकुंडवार यांनी घेतला. त्या वेळी ते बोलत होते. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर आयुक्त तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपायुक्त विजय मुळीक या वेळी उपस्थित होते.
डॉ. पुलकुंडवार म्हणाले, ‘मानाच्या पालख्यांच्या विश्वस्तांसोबत बैठक घेऊन त्यांच्या सूचनेनुसार कार्यवाही करावी. वारी कालावधीत अन्न शुद्धतेची खात्री करण्यासाठी आवश्यकतेनुसार अन्न आणि औषध प्रशासनाकडील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून या काळात अन्न भेसळ करणाऱ्यांविरोधात व्यापक मोहीम राबविण्यात यावी. पालखी सोहळ्यादरम्यान आणि नंतरही स्वच्छता राहावी, यासाठी आवश्यकतेनुसार स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी.’
‘चंद्रभागेचे पाणी स्वच्छ राहील, यासाठी आवश्यक उपाय योजावेत. नीरा नदी परिसर स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. पालखी मार्ग खड्डेमुक्त राहतील आणि वाहतूक व्यवस्थापन उत्तम राहील, याची काळजी घ्यावी. पालखी मार्गावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा. घाट परिसरात दरड कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात,’ असेही त्यांनी सांगितले.
पूर्वतयारीत विविध बाबींचा समावेश
सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सादरीकरणाद्वारे पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीची माहिती दिली. ‘सोहळ्यासाठी घटना प्रतिसाद प्रणाली स्थापण्यात आली आहे. २५ हजार ५०० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सोहळ्यादरम्यान एक हजार ८६० स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. पालखी मार्गावर पाणी, विद्युत, आरोग्य, गॅस सिलिंडर, स्वच्छता आदी सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे. महिलांसाठी विशेष सुविधा करण्यात येत आहेत. वारीच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. गर्दी व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याबाबत चाचणी घेण्यात येत आहे,’ असे त्यांनी सांगितले.