पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीबाबत अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काँग्रेससोबत आघाडीचे संकेत दिले आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या पराभवासाठी आघाडी होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी पुण्यात आज, मंगळवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी त्यांनी भाजपवर शरसंधान साधले.

पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होईल की नाही, याबाबत चित्र स्पष्ट नसले तरी, दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते आघाडी करण्यास अनुकूल आहेत, असे सध्या तरी दिसते. पुण्यात आज अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तसे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपवर तोफ डागली. सध्या सोशल मीडियाचे दिवस आहेत. पक्षाची भूमिका त्या माध्यमातून मांडली पाहिजे. कोणी वॉर रुम म्हणून नाव देतात. पण आम्ही कोणावर वार करायला चाललो नाही. आम्ही नियंत्रण कक्ष तयार केला आहे. त्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे, असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली.

पुणे महापालिका जिंकण्याचे आव्हान असलेल्या अजित पवार यांनी आघाडीबाबतही आपले मत मांडले. आघाडी करण्याचे अधिकार शहराध्यक्षांना देण्यात आले आहेत. सन्मानपूर्वक जागावाटप व्हावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. जागावाटपात कार्यकर्त्यांचे समाधान झाले पाहिजे, असेही ते म्हणाले. आघाडीबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत व्हायला हवा. भाजप-शिवसेनेच्या पराभवासाठी आघाडी होणे आवश्यक आहे. जातीयवादी पक्षांचा पराभव करण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. युतीच्या निर्णयावर आघाडी अवलंबून नाही. ज्याची शहरात ताकद जास्त असेल त्या प्रमाणात जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पक्षातून गेले त्यांना पक्षाने प्रतिष्ठा दिली, असे सांगून त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्यांवर टीकास्त्र सोडले. पुणेकरांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, असे आवाहनही त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले. यंदा निवडणूक अर्ज भरण्याची पद्धत किचकट आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, यावेळी माजी उपमहापौर बंडु गायकवाड यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.