राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू पुण्यात प्रचारासाठी आले आहेत. मात्र, त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत मुळा आणि मुठा नद्यांसंदर्भात केलेल्या एका टिप्पणीमुळे पुणेकरांचा स्वाभिमान दुखावला जाण्याची शक्यता आहे. सध्या निवडणुकांचा माहौल असल्यामुळे राजकीय वातावरणही तापण्याची शक्यता आहे. मुळा मुठा हे काय नाव आहे का? बॉम्बेचं नामकरण मुंबई केलं तसलं काहीतरी करा, असे नायडू यावेळी बोलून गेले. पुण्यातील प्रादेशिक आणि भावनिक राजकारणाशी नायडू परिचित नसल्यामुळे त्यांनी अनावधानाने हे विधान केल्याची शक्यता आहे. मात्र, निवडणुकीच्या तोडांवर त्यांचे हे विधान प्रादेशिक अस्मितेच्या मुद्द्यावरून भाजपला नक्कीच अडचणीत आणणारे ठरू शकते.

दरम्यान, या पत्रकार परिषदेत नायडू यांनी ‘सामना’ वृत्तपत्रावर बंदी घालण्याच्या मागणीवरून भाजपला घरचा आहेर दिला. वर्तमानपत्रावर बंदी घालणे हा आमच्या पक्षाचा सिद्धांत नाही. त्यामुळे आम्ही कोणत्याही वर्तमानपत्रावर बंदी घालून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणार नाही. ज्यांना जे लिहायचं ते लिहू द्या. पंतप्रधानांविरोधात लिहिणार असतील, तर ‘सामना’ स्वत:च आपली पातळी आणखी घसरवेल, असे नायडू यांनी सांगितले. तसेच नायडूंनी स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या पक्षांतर्गत राजकारणावरूनही नेत्यांना कानपिचक्या दिल्या. एखाद्याला पक्षात प्रवेश देताना किंवा उमेदवारी देताना काळजी घ्यायला हवी, असे नायडू यांनी म्हटले. त्यांच्या या विधानाचा रोख भाजपमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना प्रवेश देण्याकडे होता. तसेच शिवसेनेकडून भाजपवर सातत्याने करण्यात येणाऱ्या टीकेसंदर्भातही त्यांनी भाष्य केले. सेना-भाजपकडून एकमेकांवर करण्यात येणारी टीका आदर्श नाही. परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे सेनेकडून टीका करण्यात येत आहे. आयुष्यभर काँग्रेसवर टीका करणाऱ्या सेनेकडून होणारं काँग्रेसचे कौतूक न समजण्यापलीकडे आहे, असे नायडू यांनी म्हटले.

२० आणि २१ फेब्रुवारीला सामना पेपर प्रसिद्ध केला जाऊ नये, अशी मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली होती. १५ फेब्रुवारीच्या अंकात आचारसंहितेचा भंग झाला असून कारवाई करा, अशी मागणीही भाजपकडून करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून सामनाला याबाबत अभिप्राय कळविण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी आयोगाकडून शिवसेनेला तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.