महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी नको अशी भूमिका प्रारंभी घेणाऱ्या काँग्रेसला आघाडीनेच हात दिल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणुकीत काँग्रेसला नऊ जागांपैकी सात जागा आघाडीमुळेच जिंकता आल्याचे चित्र समोर आले असून स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसला पुण्यात अवघ्या दोन जागा स्वत:च्या ताकदीवर जिंकता आल्या आहेत.

महापालिका निवडणुकीची घोषणा होताच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी होणार की नाही, याबाबत चर्चा सुरु झाली. मुलाखतींचा टप्पा होण्यापूर्वी काँग्रेसकडून स्वबळाची भाषा केली जात होती. त्यानंतर काही प्रभागात जागा वाटपाचा तिढा कायम राहिल्यामुळे अखेरच्या क्षणी काही प्रभागात आघाडी तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती असा निर्णय घेण्यात आला. शहरातील ४१ प्रभागांपैकी २२ प्रभागांमध्ये या दोन्ही पक्षांची आघाडी झाली तर १९ प्रभागात मैत्रीपूर्ण लढती झाल्या. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या हडपसर, वडगांवशेरी, धनकवडी आणि सिंहगड रस्ता परिसरातील सात प्रभागांवर हक्क सांगत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व ठिकाणी उमेदवार दिले. तर काँग्रेसच्या वाटय़ाला पूर्णपणे लढण्यासाठी दोन प्रभाग आले. अन्य तेरा प्रभागांमध्ये एकमेकांच्या संमतीने जागा सोडण्यात आल्या.

स्वबळाचा विचार केला तर आघाडी नसलेल्या ज्या प्रभागातून काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले त्यांची संख्या अवघी दोन आहे. तर, स्वबळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जेथे लढले तेथील अठरा जागांवर राष्ट्रवादीला यश मिळाले. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांचे पुत्र अविनाश आणि रफिक शेख हे लोहियानगर-काशेवाडी या प्रभागातून विजयी झाले आहेत.

लढवलेल्या जागांचा विचार करता राष्ट्रवादीला आघाडीमध्ये सर्वाधिक ५६ तर काँग्रेसला अवघ्या ३० जागा मिळाल्या. आघाडी झालेल्या २२ प्रभागांपैकी ११ प्रभागांमध्ये आघाडीला यश मिळाले नाही. तर उर्वरित ११ प्रभागात राष्ट्रवादीला २० तर काँग्रेसला ९ जागा काँग्रेसला मिळाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.