पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीत ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’च्या (आरपीआय) आठवले गटाने भाजपशी युती करून ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवली. त्यात सहा नगरसेवक निवडून आले; पण आता निवडणुकीनंतर पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. उमेदवार निवडीसाठी पक्षाने नेमलेल्या ‘कोअर कमिटी’ला डावलून उमेदवारांना पक्ष कार्यालयाऐवजी घरातून ‘एबी’ अर्जवाटप केल्याचा ठपका ठेवून पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांची हकालपट्टी करण्याचा ठराव समितीने केला आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर या पक्षात राजकीय गोंधळ सुरू झाला आहे.

भाजप आणि ‘आरपीआय’ची पुण्यात युती झाली. मात्र, प्रारंभी भाजपकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे लक्षात येताच ‘आरपीआय’च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपच्या शहर कार्यालयासमोर आंंदोलन केले. उमेदवारी न दिल्यास प्रचार न करण्याची भूमिका या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली.

ऐन निवडणुकीत या पक्षाने घेतलेल्या पवित्र्यानंतर भाजपला ‘आरपीआय’ची दखल घ्यावी लागली. त्यानंतर ‘आरपीआय’ला नऊ जागा देण्यात आल्या. त्यापैकी सहा जागांवर उमेदवार निवडून आले. त्यामध्ये परशुराम वाडेकर, अश्विनी भंडारे, निशा मानवतकर, नीलेश आल्हाट, हिमानी कांबळे आणि मृणाल कांबळे यांचा समावेश आहे. आता ‘आरपीआय’चे सहा नगरसेवक झाले आहेत. मात्र, ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यापैकी परशुराम वाडेकर, हिमानी कांबळे आणि नीलेश अल्हाट हे तिघे मूळचे ‘आरपीआय’मधील आहेत. उर्वरित भाजपमधील असून, त्यांना ‘आरपीआय’च्या कोट्यातून उमेदवारी देण्यात आली.

निवडणूक झाली आणि निकाल जाहीर होऊन महापौर आणि उपमहापौर निवडीपर्यंत प्रक्रिया आल्यानंतर आता ‘आरपीआय’मध्ये वाद सुरू झाले आहेत. उमेदवारांना ‘एबी’ अर्ज देताना गैरप्रकार झाल्याचा ठपका ठेवून पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांना पक्षातून हकालपट्टी करण्याचा ठराव शहर कार्यकारणी आणि ‘कोअर कमिटी’ने केला आहे. या बैठकीला पक्षाचे प्रभारी शैलेंद्र चव्हाण, राज्य उपाध्यक्ष रोहिदास गायकवाड, मंदार जोशी, माजी शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, असित गांगुर्डे, अशोक कांबळे, अशोक शिरोळे आदी उपस्थित होते.

‘पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशाची अंमलबजावणी न करता, स्वतःचे अधिकार वापरून मर्जीतील उमेदवारांना पक्ष कार्यालयात ‘एबी’ अर्ज न देता स्वतःच्या घरातून अर्जवाटप करण्यात आल्याने पक्षाचे नुकसान झाले. याबाबत शहरातील कोअर कमिटीच्या कोणालीही कल्पना दिली नाही. त्यामुळे बाळासाहेब जानराव यांची हकालपट्टी करण्यात यावी,’ असा ठराव या बैठकीत करण्यात आला. त्यावरून या पक्षात वादावादी सुरू झाली आहे.

याबाबत पक्षाचे माजी शहराध्यक्ष महेंद्र कांबळे म्हणाले, ‘पक्षाच्या उमेदवारांना ‘एबी’ अर्जवाटप करताना जानराव यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. त्यांनी पक्ष कार्यालयाऐवजी स्वतःच्या घरातून ‘एबी’ अर्जाचे वाटप केले. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे पत्र राज्य पातळीवरील नेत्यांकडे पाठविण्यात आले आहे.’

याबाबत बाळासाहेब जानराव म्हणाले, ‘उमेदवारांना ‘एबी’ अर्जवाटप करताना कोणताही गैरप्रकार झालेला नाही. काही पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच वाटप करण्यात आले आहे.’ ‘शहराध्यक्षांच्या अनुपस्थितीत झालेली कोअर कमिटीची बैठक अवैध ठरते. जानराव यांच्याविरुद्ध द्वेषापोटी कारवाई करण्यात आली आहे,’ असा दावा शहराध्यक्ष संजय सोनवणे यांनी केला.