पुणे : मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी मतदाराने मतदान यंत्रावरील ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ या चारही गटांतील एकेक बटण दाबणे अनिवार्य असेल. एखाद्या मतदाराला प्रभागातील चारपैकी एकाच उमेदवाराला मत द्यायचे असेल, तर उरलेल्या तीन ठिकाणी त्याला ‘नोटा’चे बटण दाबून मतदान प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्याने हे न केल्यास संबंधित मतदान केंद्राध्यक्ष नियमानुसार ही प्रक्रिया पूर्ण करील.

महापालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. महापालिका निवडणुकीसाठी उद्या (गुरुवारी) १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे, तर शुक्रवारी १६ जानेवारी रोजी मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर होईल. पुणे महापालिकेत ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी निवडणूक होणार आहे. ४० प्रभाग हे चार सदस्यांचे असून, एक प्रभाग पाच सदस्यांचा असणार आहे. त्यामुळे जेवढे उमेदवार आहेत, तितकीच मते देणे आवश्यक आहे. मतदारांना जो उमेदवार योग्य वाटत नाही, तेथे ‘नोटा’ बटण दाबून मतदानाची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

‘मतदाराने चारपैकी एक, दोन किंवा तीनच उमेदवारांना मत दिल्यास मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही,’ असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, ‘चारच्या प्रभागात चार आणि पाच सदस्यांच्या प्रभागात मतदारांनी मतदान यंत्रावरील पाच बटणे दाबून मतदान प्रक्रिया पूर्ण करावी,’ असे आवाहन महापालिकेने केले आहे.

नागरिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धतीबाबत मोठा संभ्रम आहे. ‘चारपेक्षा कमी मते दिल्यास उर्वरित मते आपोआप ‘नोटा’ला जातील,’ ‘तीनच मते दिली, तरी मतदान पूर्ण होईल,’ असे गैरसमज पसरविले जात आहेत. मात्र, यात कोणतेही तथ्य नाही. मतदानाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी चारही मते ‘ईव्हीएम’मध्ये नोंदविली जाणे गरजेचे आहे. ‘मतदान केंद्रांवर कोणताही गोंधळ होऊ नये, मतदानाच्या प्रक्रियेला उशीर होऊ नये, तसेच मतदारांचा वेळ वाया जाऊ नये, यासाठी प्रत्येक मतदाराने ईव्हीएमवर चार वेळा बटण दाबून मतदान पूर्ण करावे,’ असे आवाहन महापालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी केले. मतदानापूर्वी नागरिकांनी नियमांची माहिती करून घेणे आवश्यक असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या निवडणूक विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर म्हणाले, जर एखाद्या व्यक्तीने चारपेक्षा कमी मतदान केल्यास मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही. अशा स्थितीत केंद्राध्यक्ष संबंधित मतदाराची दिलेली मते पूर्णपणे गोपनीय राहतील, याची दक्षता घेऊन मतदान केंद्राबाहेरील सर्व पक्षांच्या बूथ प्रमुखांना बोलावेल. त्यानंतर ज्या गटातील उमेदवारांना मत नोंदविण्यात आलेले नाही, त्या गटासाठीचे ‘नोटा’ बटण दाबून मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

मतदारांनी कमी मते दिल्यास काय होईल?

‘मतदानाच्या वेळी एखाद्या मतदाराने चारपैकी कमी मते दिल्यास ‘ईव्हीएम’वरील मतदान प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे मतदाराला केंद्राध्यक्ष उर्वरित मते द्यावीत किंवा ‘नोटा’साठी मत नोंदवावे, अशी विनंती करतील. त्यानंतरही संबंधित मतदाराने कोणालाही मत दिले नाही आणि तेथून निघून गेला, तर मतदान केंद्राचे अध्यक्ष मतदाराने दिलेली मते वा मत पूर्णपणे गोपनीय राहतील, याची दक्षता घेऊन मतदान केंद्राबाहेरील सर्व पक्षांच्या बूथ प्रमुखांना बोलावतील. त्यानंतर ज्या गटातील उमेदवाराला मत देण्यात आलेले नाही, त्या गटातील ‘नोटा’चे बटण दाबून चार मते देण्याची मतदान प्रक्रिया पूर्ण करतील. यामुळे या मतदाराने नोंदविलेल्या पूर्वीच्या मतांवर कोणताही परिणाम होणार नाही.

मतदानाची प्रक्रिया ३० सेकंदांत

लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत मतदाराला केवळ एका उमेदवाराला मत द्यायचे होते. त्यामुळे अवघ्या काही सेकंदांत उमेदवाराच्या नावासमोरील ‘ईव्हीएम’चे बटण दाबून मतदान प्रक्रिया पूर्ण होत होती. मात्र, महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होत असून, निवडणुकीत अ, ब, क आणि ड या क्रमानुसार चार जणांना मतदान करायचे आहे. त्यामुळे चौघांपुढील बटण दाबण्यासाठी सर्वसाधारणपणे ३० ते ४० सेंकदाचा वेळ लागणार आहे.

एका ‘ईव्हीएम’वर १४ नावे

एका ‘ईव्हीएम’वर १४ नावे बसतात. समजा ‘अ’ जागेचे ७ उमेदवार असल्यास त्यानंतर ८ व्या क्रमांकावर जागेवर ‘नोटा’चे बटण राहणार आहे. नवव्या क्रमांकावर ‘ब’ जागेचे उमेदवार असा मथळा असेल. त्यानंतर ‘ब’ जागेसाठी ४ उमेदवार असल्यास १४ व्या क्रमांकावर ‘नोटा’चे बटण राहील. त्यापुढील ईव्हीएम यंत्रावरदेखील याच पद्धतीने ‘क’ आणि ‘ड’चे उमेदवार राहतील. प्रत्येक गटाच्या शेवटी ‘नोटा’ असे बटण राहणार आहे. एखाद्या मतदाराला एकही उमेदवार सक्षम वाटत नसेल, तर त्याला चार गटासाठी ‘नोटा’ची बटणे दाबावी लागणार आहेत.