मतदान केंद्रांबाहेरील फलकांचा उपयोगच नाही

काही मतदान केंद्रांवर उमेदवारांबद्दलच्या माहितीचे लावलेले फलक रात्रीतून ‘गायब’ करण्यात आल्याचेही दिसले

 

उमेदवारांचे गुन्हे, शिक्षण, मालमत्ता याबाबतची माहिती मतदारांनी वाचलीच नाही!

उमेदवारांचे गुन्हे, शिक्षण व त्यांची स्थावर-जंगम मालमत्ता याबद्दलची महत्त्वाची माहिती देणारे फलक निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रांबाहेर लावण्याचे हे पहिलेच वर्ष. परंतु मतदार राजा मतदानापूर्वी हे फलक वाचेल आणि त्यावरून कोणाला मत द्यायचे याबद्दल त्याच्या मनात स्पष्टता येईल, अशी यामागची संकल्पना पहिल्या वर्षी तरी पूर्ण होताना दिसली नाही.

अनेक केंद्रांवर हे फलक वाचण्याजोग्या ठिकाणी लावलेले नव्हते. काही मतदान केंद्रांवर ते केंद्रांच्या बाहेर रस्त्यावर लावले होते, तर काही केंद्रांमध्ये केंद्राच्या आवारात ठेवण्यात आले होते. त्याकडे सहज लक्ष जात नव्हते. शिवाय फलकांवरील मजकुराचा टंकदेखील डोळ्यात भरेल असा ठसठशीत नसल्यामुळे उमेदवारांची माहिती  प्रदर्शित करणे हा केवळ उपचारच राहिला. बहुसंख्य केंद्रांवर मतदार या फलकांकडे ढुंकूनही पाहात नव्हते. इतर मतदारांनीही फलक वाचण्यास विशेष महत्त्व दिले नाही. विविध केंद्रांवर मतदारांशी संवाद साधला असता फलक दिसलेच नाहीत, त्यामुळे वाचले नाही, असे उत्तर मतदारांकडून मिळत होते. प्रथमच मतदान करण्यासाठी आलेल्या उत्साही मतदारांचे लक्ष फलक वाचत बसण्यापेक्षा आधी मतदान करणे व त्याचा ‘सेल्फी’ काढण्याकडे असल्याचे दिसून आले.

काही केंद्रांवर आपल्या भागातील कोणता उमेदवार अतिश्रीमंत आहे, कुणावर गंभीर गुन्हे आहेत, हे वाचण्यासाठी मतदार घोळके करून चर्चा करत उभे होते खरे, पण ते मतदान करून झाल्यावर! मतदान करून निवांत झालेल्या मतदारांमध्ये ‘अमुक उमेदवार इतका ‘गबर’ कसा झाला,’ अशा गप्पा रंगलेल्या ऐकायला मिळत होत्या.

काही मतदान केंद्रावरून फलक ‘गायब’!

काही मतदान केंद्रांवर उमेदवारांबद्दलच्या माहितीचे लावलेले फलक रात्रीतून ‘गायब’ करण्यात आल्याचेही दिसले. बिबवेवाडीतील रोझरी शाळेबाहेर लावलेला फलक कुणीतरी काढून नेला होता, तर वाकडमधील एका मतदान केंद्रावरून हे फलक उचलून कचऱ्यात फेकून दिले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pmc elections 2017 pune voters ignore candidate affidavit pune voters