शिवाजीनगरमध्ये मतदारांचा उत्साह बेताचाच

शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील प्रभागांमध्ये किरकोळ वादाचे प्रसंग वगळता शांततेत मतदान झाले.

खासदार अनिल शिरोळे यांनी सकाळी साडेआठ वाजता शिवाजीनगर येथील मॉडर्न हायस्कूल येथे मतदानाचा हक्क बजावला.

 

किरकोळ वादाचे प्रकार वगळता मतदान शांततेत

शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील प्रभागांमध्ये किरकोळ वादाचे प्रसंग वगळता शांततेत मतदान झाले. मात्र या भागांतील प्रभागांमध्ये मतदारांचा उत्साह बेतासबेतच असल्याचे दिसून आले. सकाळी उत्साहाने मतदान केंद्रांवरील गर्दी आणि मतदारांचा उत्साह वाढत्या उन्हाबरोबर कमी झाल्याचे चित्र सगळीकडे होते.

विधानसभा शिवाजीनगर मतदारसंघात विद्यापीठ-वाकडेवाडी (प्रभाग ७), औंध-बोपोडी (प्रभाग ८), बाणेर- बालेवाडी – पाषाण (प्रभाग ९), डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी (प्रभाग १४) अशा चार प्रभागांचा प्रामुख्याने समावेश होता. या भागातील मिश्र वस्ती आणि चर्चेतील लढती या चारही प्रभागांचे वैशिष्टय़ होते. सकाळी साडेसात वाजता सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेत रहिवासी सोसायटय़ांमध्ये मतदारांचा प्रतिसाद चांगला होता. नोकरीवर जाण्यापूर्वी मतदान करण्यासाठी केंद्रावर सकाळी गर्दी झाल्याचे चित्र दिसत होते. सकाळी तयार झालेले आशादायक चित्र दुपारनंतर हळूहळू बदलू लागले. सोसायटय़ांच्या भागातील मतदान केंद्रांवरील गर्दी दुपारनंतर हळूहळू कमी होऊ लागली. आयटी कंपन्या आणि काही शाळांना सुट्टी देण्यात आली नव्हती. त्याचाही परिणाम बाणेर, बालेवाडी या भागांतील मतदानावर दिसून आला. त्यानंतर मात्र मतदारांचा उत्साह कमीच राहिला. याउलट चित्र झोपडपट्टी भागांत दिसत होते. दुपारनंतर या भागांतील मतदान केंद्रावर गर्दी वाढू लागली. जनवाडी, जनता वसाहत, हनुमान नगर, वडार वस्ती, पाटील इस्टेट या भागांत सकाळी साडेअकरानंतर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. काही भागांतील मतदान उशिरापर्यंत सुरूच होते.

कार्यकर्त्यांमध्ये वाद

राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब बोडके आणि शिवसेनेचे उमेदवार राजू पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पैसे वाटप करत असल्याच्या आरोप प्रत्यारोपातून वादावादी झाली. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती आटोक्यात आली आणि केंद्रावरील मतदान शांततेत पार पडले. बाणेर येथेही बाबुराव चांदेरे आणि विनायक निम्हण यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. कार्यकर्त्यांनी बाणेर स्मशान भूमीजवळ एकमेकांच्या गाडय़ांचीही तोडफोड केली. तेथील परिस्थितीही पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे आटोक्यात आली.

नाव शोधण्यासाठी धावपळ

अनेक भागांमध्ये वर्षांनुवर्षांचे मतदान केंद्र बदलल्याने अनेकांना आपले केंद्र शोधण्यासाठी धावाधाव करावी लागत होती. मतदार यादीतून नावे वगळल्याच्या काही तक्रारी शिवाजीनगर भागांतील मतदारांकडून करण्यात येत असल्याचे दिसून येत होते. त्याचप्रमाणे यादीक्रमांकाऐवजी ब्लॉक क्रमांक असल्यामुळेही मतदार गोंधळल्याचे दिसत होते.

मतदान प्रक्रिया संथपणे

अनेक ठिकाणी मतदान केंद्राबाहेर असलेल्या मतपत्रिकेवरील माहिती समाजावून सांगितली जात होती. चार बटणे दाबायची आहेत त्याशिवाय मतदान होणार नाही याबाबत मतदारांमध्ये जागृती करण्यात येत होती. या गोंधळामुळे मतदानाला वेळ लागत होता. त्यामुळे काही केंद्रांवरील प्रक्रिया संथपणे सुरू होती.

दिव्यांगांचे हाल

प्रभाग क्रमांक सातमधील नरवीर तानाजी विद्यामंदिर येथे पहिल्या मजल्यावर मतदान केंद्र होते. तसेच या शाळेपर्यंत जाणारा रस्तादेखील दुरुस्तीच्या कामासाठी खोदला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pmc elections 2017 shivajinagar assembly constituency voters in shivajinagar pune pune voters