सत्ता कुणाची?.. उत्कंठा शिगेला!

महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी ८२ जागांचा टप्पा पार करावा लागणार आहे

मतदान संपायला अवघा एक तास उरल्यानंतर मंगळवारी शहरातील अनेक केंद्रांवर मतदारांच्या अशा रांगा लागल्या. मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर मतदान यंत्रे सील करण्याची कार्यवाही शासकीय कर्मचाऱ्यांनी केली. (छायाचित्रे: तन्मय ठोंबरे).

पुण्यात मतदान उत्साहात; विविध पक्षांच्या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

महापालिका निवडणुकीनंतरच्या सत्ताप्राप्तीसाठी राजकीय पक्षांनी मांडलेले आडाखे, मतदानानंतर सुरू झालेल्या चर्चा, मतदान्नोतर सर्वेक्षण यामुळे संपूर्ण शहरात राजकीय चर्चाना उधाण आले असून महापालिकेत सत्ता कोणाची, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. महापालिकेत भाजप परिवर्तन घडविणार की सत्तेच्या चाव्या पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती जाणार हे गुरुवारी (२३ फेब्रुवारी) स्पष्ट होणार आहे. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास कोणते पर्याय स्वीकारावे लागतील, याची चाचपणीही राजकीय पक्षांकडून सुरू झाली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस-भारतीय जनता पक्ष यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सामना रंगला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपमध्ये लढाई असली तरी शिवसेना आणि काँग्रेसची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. निवडणुकीची चाहूल लागल्यानंतर भाजप सत्तेवर येईल, अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. या निवडणुकीत झालेली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची काही प्रभागांमधील आघाडी सोडली तर सर्वच पक्षांनी या निवडणुकीच्या निमित्ताने स्वबळ आजमाविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे महापालिकेची सत्ता नेमकी कोणाला मिळणार, याबाबत उत्कंठा निर्माण झाली होती. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तर या चर्चेला अधिक जोर मिळाला आहे.

महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी ८२ जागांचा टप्पा पार करावा लागणार आहे. निवडणुकीपूर्वी काही काळ भाजपला सत्तेसाठीचे अनुकूल वातावरण होते. मात्र त्यानंतर आयात उमेदवारांवर दाखविण्यात आलेली भिस्त, उमेदवारी यादीतील घोळ, पक्षात झालेले गुंडांचे प्रवेश, त्यांना देण्यात आलेली उमेदवारी यामुळे काहीप्रमाणात भाजपला प्रतिकूल वातावरण तयार झाल्याचेही दिसून आले. निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेची पंचवीस वर्षांपूर्वीची युती तुटली. तर सत्ता मिळविण्यासाठी आणि प्रतिकूल वातावरण लक्षात घेऊन शेवटच्या क्षणी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची काही जागांवर आघाडी झाली. त्यामुळे भाजपला सत्ता मिळणार का, आघाडीचा दोन्ही काँग्रेसला फायदा होणार का, याबाबत सध्या चर्चा आहे.

आमिषांबरोबरच मतदारांना धमकावण्याचेही प्रकार

पुणे : कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायची असा निर्धार करून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांकडून मतदानाच्या दिवशी मतदारांना आमिषे दाखवण्याचे प्रकार सुरू होते. रविवारी (१९ फेब्रुवारी) प्रचाराची सांगता झाल्यानंतर मतांचा भाव फुटला. पुणे शहरातील उपनगरात प्रत्येक मताला दोन ते पाच हजार रूपये असा भाव फुटला. मतदानाच्या दिवशी उमेदवारांकडून मतदारांना आमिषे दाखवण्यात आली. मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू होते. जास्त रकमेची ‘बोली’ लागल्यानंतर अनेक भागातील मतदार घराबाहेर पडले.

काही प्रभागातील गुंड प्रवृत्तीचे उमेदवार आणि त्यांच्या साथीदारांनी मतदारांना धमकावले. प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांना धमकावण्याचे प्रकार घडले. मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी काही उमेदवारांकडून खास व्यवस्था करण्यात आली होती.  सिंहगड रस्ता, बिबवेवाडी, कात्रज, भवानी पेठ, कासेवाडी, इंदिरानगर, हडपसर, वडगाव शेरी, वारजे भागात उमेदवारांकडून मतदार यादीतील नावे शोधून देण्यासाठी खास कार्यकर्ते नेमले होते. सोमवारी (२० फेब्रुवारी) उपनगरातील प्रमुख चौकात मंडप उभारून मतदार यादीतील नावे शोधून दिली जातील, असे फलक लावण्यात आले होते. उपनगरातील अनेक मतदारांना नावे शोधून देणाऱ्या कार्यकर्त्यांनी आमिषे दाखवली. संवेदनशील प्रभागात प्रतिस्पर्धी उमेदवारांचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना धमक्या देण्याचे प्रकार सोमवारपासून सुरू झाले होते,  अशी माहिती सूत्रांनी दिली.

शिधापत्रिका पाहून पैशांचे वाटप

प्रचाराची सांगता झाल्यानंतर उमेदवारांकडून मतदारांना लक्ष्मीदर्शनाचा योग घडवण्यात आला. काही भागात विशेषत: झोपडपट्टय़ांमध्ये सोमवारी उमेदवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मार्फ त पैशांचे वाटप सुरू केले. उपनगरात तर प्रत्येक मताला अडीच ते तीन हजार रूपये असा भाव फुटला होता. काही ठिकाणी शिधापत्रिका पाहून, येणाऱ्या मतदारांच्या घरातील मतदारांची संख्या पाहून पैशांचे वाटप करण्यात आले. शिधापत्रिके चा पुरावा ग्राह्य़ धरून मतदारांना पैशांचे वाटप करण्यात आले. काही भागात उमेदवारांकडून जास्तीची बोली लावण्यात आली. त्यानंतर तेथील मतदानाचा वेग वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले.

संवेदनशील प्रभागांमध्ये चोख बंदोबस्त

शहराचा मध्यभाग तसेच उपनगरातील संवेदनशील प्रभागांत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अशा प्रभागांमध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मतदानाच्या केंद्राबाहेर गर्दी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी थांबण्यास मज्जाव केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

चिखली-जाधववाडीत तणाव

पुणे : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीला वादावादीचे गालबोट लागले. प्रभाग क्रमांक २ मध्ये मतदान केंद्रावरच दोन गटात मारामारी झाली. त्यामुळे जाधववाडी येथील मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणावरुन उशिरापर्यंत पोलिसांमध्ये तक्रार झाली नव्हती. प्रभाग क्रमांक २ मोशी, जाधववाडी मधील जाधववाडी जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रावर दुपारी साडेबाराला शिवसेना आणि कॉंग्रेसच्या उमेदवारामध्ये वादावादी झाली, त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. त्यानंतर मातदान केंद्राजवळ मोठा जमाव जमला.काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर अनुचित प्रकार टळला. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांची जादा कुमक मागवली.

मतदान केल्यानंतर शाई गायब!

मतदान केल्यानंतर काही वेळातच बोटावरची शाई निघून जाते, असा अनुभव चिंचवडच्या नागरिकांनीही घेतला. शांतिबन सोसायटीतील लुणावत या एकाच कुटुंबातील सहा जणांसह एकूण १५ मतदारांनी आपल्या हातावरील शाई पुसून गेल्याची तक्रार केली आहे. बोगस मतदान करण्यासाठी सोयीचे व्हावे म्हणून अशाप्रकारची शाई वापरण्यात आली का, असा प्रश्नही या नागरिकांनी उपस्थित केला आहे. दीड वाजता या रहिवाशांनी मतदान केले. घरी आल्यानंतर जेवण केले व हात धुतले, तेव्हा शाई पुसून गेली होती. एकाने दुसऱ्याला सांगितले असता, सर्वानी पडताळून पाहिले. तेव्हा सर्वाना एकसारखा अनुभव आला. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

सोसायटीत मतदान केंद्र असूनही नसल्यासारखे!

निवडणूक आयोगाने गृहनिर्माण संस्थांमधील मतदारांचा प्रतिसाद वाढावा, या हेतूने तिथेच मतदान केंद्र उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मतदार याद्यांमधील घोळामुळे गृहनिर्माण संस्थांमधील अनेक मतदार हक्कापासून वंचित राहिल्याचे चित्र पहायला मिळाले. या चुकांमुळे गृहनिर्माण संस्थांमधील मतदान केंद्र नावालाच राहिल्याचे दिसून आले. चिखली येथील ‘ऐश्वर्यम कोर्टयार्ड’ या गृहनिर्माण संस्थेमधील मतदारांसाठी स्वतंत्र मतदान केंद्र उघडण्यात आले होते. या ठिकाणी ८०० मतदार आहेत. येथील मतदारांची नावे दुसऱ्या मतदान केंद्रामध्ये होती, तर काही नावे शेजारच्या प्रभागात होती. सोसायटीत मतदान केंद्र असल्याने शंभर टक्के मतदान करण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला होता. मात्र, याद्यांमधील घोळामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला.  शहरातील बहुतांश गृहनिर्माण संस्थांमध्ये कमी-अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pmc elections 2017 voters threatened in pune enthusiastic voting in pune

ताज्या बातम्या