पुणे : वर्षभरापासून सुरू असलेली कामे अद्यापही अपूर्ण असल्याने आणि रस्ते खोदाई केल्याशिवाय ती पूर्ण होणार नसल्याने रस्ते खोदाईला ३१ मे पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळय़ाच्या तोंडावरही रस्ते खोदाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती आणि रस्ते पूर्ववत करण्याची प्रक्रिया भर पावसाळय़ातच सुरू राहणार असून वाहनचालक आणि नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागणार आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा, पथ विभाग, मलनिस्सारण विभागाबरोबरच क्षेत्रीय कार्यालयांकडून विविध कामे केली जातात. त्यामुळे रस्ते खोदाई केली जाते. शहराच्या मध्यवस्तीतील लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्त्यासह सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि शनिवार पेठेतील अंतर्गत रस्ते मोठय़ा प्रमाणात खोदण्यात आले आहेत. गेल्या वर्षी करोना काळात पावसाळय़ापूर्वी या रस्त्यांवर खोदाई करण्यात आली होती. ही कामे १५ मे अखेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. पंधरा मे नंतर रस्ते खोदाईला परवानगी दिली जाणार नाही. पंधरा मेपासून  जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत रस्ते पूर्ववत करण्यात येतील, असे महापालिका प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र वर्षभरानंतरही कामे पूर्ण होऊ न शकल्याने रस्ते खोदाईच्या कामांना ३१ मे पर्यंत मुदतवाढ महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी दिली आहे.

रस्ते खोदाईच्या कामांना मुदतवाढ दिल्याने रस्ते पूर्ववत करण्याची प्रक्रियाही लांबणीवर पडली आहे. खोदाईची कामे पूर्ण झाल्याशिवाय रस्त्यांची डागडुजी करता येत नाही. ही कामे आता सात जूनपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे भर पावसाळय़ात रस्ते पूर्ववत करण्याची कामे सुरू राहणार आहेत. गेल्या वर्षीही  पावसाळय़ातच रस्त्यांची डागडुजी करण्यात आली होती. मात्र ती कामे घाईगडबडीत करण्यात आली. अशास्त्रीय पद्धतीने कामे झाल्याने अल्पवधीतच रस्त्यांची दुरवस्था

झाली होती. त्यावर केलेला कोटय़वधींचा खर्चही वाया गेला होता. रस्ते दुरुस्तीसाठी कमी कालावधी मिळणार असल्याने कामांच्या गुणवत्तेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.

सदोष दुरुस्ती

रस्त्यांची खोदाई केल्यानंतर  संबंधित ठेकेदाराकडून रस्त्यांची डागडुजी केली जाते. मात्र, डागडुजी निकृष्ट आणि दर्जाहीन तसेच अशास्त्रीय पद्धतीची असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पावसाळय़ापूर्वी घाईगडबडीत दुरुस्त केलेल्या रस्त्यांवर पावसाळय़ात पुन्हा खड्डे पडत असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे दुरुस्तीवर केलेला खर्चही वाया जात आहे.