पुणे : शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी साचणाऱ्या भागांसाठी कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, सुटीच्या दिवशीही आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत ठेवण्याचे ठरविण्यात आले आहे.
महापालिकेचे सभागृहनेते गणेश बिडकर यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षात प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये हे निर्णय घेण्यात आले. मलनिःसारण व देखभाल दुरुस्ती विभागाचे मुख्य अभियंता जगदीश खानोरे, पथ विभागाचे राजेश बनकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने, नगरसेविका अर्चना जगताप, वृषाली कामठे, पूजा कदम आदी या वेळी उपस्थित होते.
‘शहरातील पाणी साचणाऱ्या संवेदनशील भागांवर लक्ष केंद्रित करून तत्काळ उपाययोजना करण्याबरोबरच भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी दीर्घकालीन नियोजन करावे. ड्रेनेज व्यवस्थेतील त्रुटी दूर करून पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होईल, यासाठी व्यापक योजना आखण्यात याव्यात,’ अशा सूचना बिडकर यांनी केल्या.
‘महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष हा आता पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी सुटीच्या दिवशीही हा विभाग सुरू राहणार आहे. त्यामुळे २४ तास नागरिकांना सेवा मिळू शकणार आहे.’ असे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे शहरात अतिवृष्टी झाल्यास कोणत्याही भागात पाणी साचू नये, यासाठी ड्रेनेज व्यवस्थेत दीर्घकालीन सुधारणा करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित विभागांनी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या. – गणेश बिडकर, सभागृह नेते, पुणे महापालिका.
