पुणे : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागेवर प्रजित नायर यांची नियुक्ती झाल्यानंतर महापाालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिकेच्या तिन्ही अतिरिक्त आयुक्तांकडे असलेल्या खात्यांमध्ये बदल केले आहेत.

अतिरिक्त आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे मिळकत कर आकारणी, प्रकल्प आणि माहिती व तंत्रज्ञान विभागासह २३ विभागांचा कार्यभार देण्यात आला आहे. उर्वरित दोन अतिरिक्त आयुक्तांकडील खात्यांचा कार्यभार कमी करून अनुक्रमे १७ आणि १८ विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

प्रजित नायर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिका आयुक्त राम यांनी तीन अतिरिक्त आयुक्तांकडील खात्यांमध्ये बदल केला आहे. राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे यापूर्वी पथ विभाग, मालमत्ता व्यवस्थापन विभाग, भूसंपादन व व्यवस्थापन विभाग, भांडार, एस. आर. ए, ऑप्टिकल फायबर इन्फ्रास्ट्रक्चर विभाग यांसह २० विभागांचा कार्यभार होता. आता त्यांच्याकडे पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे असलेल्या मिळकत कर, माहिती व तंत्रज्ञान आणि प्रकल्प या मोठ्या विभागांसह समाज विकास व समाज कल्याण विभागांचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

अतिरिक्त आयुक्त (जनरल) पवनीत कौर यांच्याकडील घनकचरा विभाग, सामान्य प्रशासन, भवन रचना विभाग, अग्निशामक दल व आपत्ती व्यवस्थापन विभाग, मंडई विभागाचा कारभार हा नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त (इस्टेट) प्रजित नायर यांच्याकडे देण्यात आला आहे. बांधकाम विभाग, ड्रेनेज व एसटीपी प्रकल्प, सुरक्षा, अतिक्रमण निर्मूलन, नगरसचिव विभाग हे पवनीत कौर यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. या बदलांमध्ये पवनीत कौर यांच्याकडील चार महत्त्वाची खाती कमी करण्यात आली आहेत.