पुणे : महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी तीन दिवसांपूर्वी प्रशासकीय कारणास्तव केलेल्या अधीक्षक अभियंता तसेच कार्यकारी अभियंत्यांच्या बदल्या रद्द करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. बदली रद्द करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली जात आहे. ‘सांगाल ते करू पण बदली थांबवा ‘ असे साकडे पदाधिकाऱ्यांना घातले जात आहे.

प्रशासकीय कामकाजात सुधारणा व्हावी तसेच वर्षानुवर्षे एकाच खात्यात बस्तान मांडून बसलेल्या आणि चर्चेचा विषय झालेल्या अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंत्यांच्या बदल्या महापालिका आयुक्त राम यांनी तीन दिवसांपूर्वी केल्या आहेत. मात्र, यातील काही अभियंत्यांकडून अद्यापही आपला पदभार सोडण्यात आलेला नाही. बदली होऊन आलेल्या अधिकारी जबाबदारी घेऊ नये, यासाठी काही अभियंत्यांनी तर चक्क आपल्या कार्यालयाला कुलूपच लावले आहे.

महापालिका आयुक्त राम यांनी केलेली बदली रद्द करावी, यासाठी काही अधिकाऱ्यांनी महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे उंबरे झिजविण्यास सुरुवात केली आहे. विकास कामात आवश्यक ती मदत करतो, पण झालेली बदली रद्द करा, असे साकडे काही अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांना घातले आहे.

महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश १९ मे रोजी काढले आहेत. मात्र, तीन दिवसानंतर देखील अनेकांनी पदभार सोडलेला नाही. त्यातच आता शनिवारी आणि रविवारी महापालिकेला सुट्टी असल्याने नवीन अधिकाऱ्यांना सोमवार नंतरच बसण्यास कार्यालये मिळणार आहेत. प्रशासकीय कामात सुधारणा व्हावी यासाठी आयुक्तांनी या बदल्या केल्या आहेत.

यामध्ये भवन, मलनिसारण, बांधकाम विभागांचा समावेश आहे. भवन, मलनिसारण विभागातील आठ जणांची बदली आयुक्तांनी केली आहे. मात्र यातील तीन ते चार अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयाला चक्क कुलूप लावले आहे. तसेच त्यांचे शिपाई इतर अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये प्रवेश देण्यास मनाई करत असल्याचे समोर आले आहे.

बदली रद्द करण्यासाठी पदाधिकारी प्रयत्नशील

महापालिका आयुक्तांनी केलेल्या बदल्या रद्द करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी देखील प्रयत्न सुरू केले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थातून निवडून जाणाऱ्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली आहे. ही आचारसंहिता सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.

निवडणुकीच्या आचारसंहिता सुरू असताना आयुक्तांना बदली करण्याचे आदेश काढता येतात का ? अशी विचारणा पदाधिकाऱ्यांकडून कडून केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत देखील यावर चर्चा झाली होती. मर्जीतील अधिकाऱ्यांची बदली रद्द करावी यासाठी पदाधिकारी देखील प्रयत्नशील असल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.