पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या शहरातील वर्तुळाकार मार्गाची काय प्रगती आहे, त्याचे भूसंपादन किती झाले आहे, नकाशे तयार आहेत का, जागा मिळवण्यासाठी काय केले आदी अनेक प्रश्नांना महापालिकेच्या मुख्य सभेत मंगळवारी ‘माहिती नाही’, ‘पाहावे लागेल’, ‘बघून सांगतो’ अशी ‘ठोस’ उत्तरे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आणि त्यांची उत्तरे ऐकून आता काय बोलावे, अशी वेळ नगरसेवकांवर आली.
पुणे शहरासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा रस्ता सर्व उपनगरांना जोडणारा असून शहरातील अनेक रस्त्यांवरील ताण कमी करण्यासाठी या रस्त्याचा उपयोग होणार आहे. विकास आराखडय़ात १९८७ मध्ये आखण्यात आलेल्या या रस्त्याची आतापर्यंत काय प्रगती झाली यासंबंधीचे लेखी प्रश्न नगरसेवक आबा बागूल यांनी मुख्य सभेला दिले होते. या प्रश्नांवर मंगळवारी सभेत बागूल यांनी चर्चा सुरू केली. मात्र, त्यांनी आणि अन्य नगरसेवकांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला आयुक्तांसह संबंधित अधिकारी योग्यप्रकारे उत्तरे देऊ शकले नाहीत.
हा नियोजित रस्ता उपनगरातील ११६ रस्त्यांना जोडणारा आहे. रस्ता ३५ किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी आतापर्यंत फक्त पाच ते सहा टक्के भूसंपादन झाले आहे. या रस्त्याची सद्यस्थिती नेमकी काय आहे, अशी विचारणा बागूल यांनी केल्यानंतर माहिती घेऊन सांगावे लागेल, भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे, अशा स्वरूपाची उत्तरे त्यांना अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या पंचवीस वर्षांत भूसंपादनासाठी नक्की काय केले असाही प्रश्न यावेळी विचारण्यात आला. मात्र, त्याचेही उत्तरे पाहावे लागेल, असे देण्यात आले. या रस्त्याच्या जागेवर बांधकामांना परवानगी दिली आहे का, या प्रश्नालाही माहिती नाही असे उत्तर देण्यात आले. जागा ताब्यात घेण्यासाठी काही पत्रव्यवहार झाला आहे का, या प्रश्नाला झाला आहे; पण कधी ते माहिती नाही असे उत्तर मिळाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आणि प्रशासनात या रस्त्याबाबत मोठी उदासीनता असल्याचे या उत्तरांवरून स्पष्ट झाले.