पुणे : शहरातील प्रमुख नाट्यगृह अशी ओळख असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास आणि नूतनीकरण करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे. १९६८ साली बांधण्यात आलेल्या बालगंधर्व रंगमंदिरात अनेक त्रुटी जाणवण्यास सुरुवात झाली असून, कलाकारांच्या तक्रारीदेखील वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर या वास्तूचा या वर्षी पुनर्विकास करण्याचा संकल्प महापालिका प्रशासनाने सोडला आहे. या वर्षी हा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

शहरातील प्रमुख नाट्यगृह असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या नूतनीकरणाचे काम गेले अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष असताना त्यांनी बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकास करण्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर त्याला कलाकार, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तीकडून झालेल्या विरोधामुळे हा प्रकल्प रखडला. मात्र, आता हा प्रकल्प पूर्ण करण्याचा ध्यास महापालिका प्रशासनाने घेतला असून, त्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत.

महापालिकेचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प मांडताना महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनीदेखील ‘बालगंधर्व’बाबत ठोस भूमिका घ्यावी लागणार असल्याचे वक्तव्य केले होते. काळानुसार येथे उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये बदल करणे आवश्यक असून, यासाठी यासाठी वेळप्रसंगी कठोर निर्णय घ्यावा लागणार असल्याचे संकेत राम यांनी दिले आहेत.

बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास आणि नूतनीकरणाचे काम या वर्षीच सुरू करून तातडीने पूर्णत्वास नेण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने केला आहे. हे काम करताना एकूण १ हजार ८०० आसन व्यवस्था असलेली तीन आधुनिक प्रेक्षागृहे, अत्याधुनिक रंगमंच, ध्वनी, प्रकाश व्यवस्था, कलाकारांसाठी सुधारित मेकअप रूम, ग्रीन रूम, स्वच्छ व आधुनिक शौचालये, पाणीपुरवठा व्यवस्था, सीसीटीव्ही, वातानुकूलिन व सुरक्षा व्यवस्था, प्रेक्षकांसाठी अधिक पार्किंग सुविधा, सुशोभीकरण, परिसराचे सुशोभीकरण, इतर सांस्कृतिक सुविधा या बाबींचा समावेश केला जाणार आहे. हे बांधकाम वर्षभरात पूर्ण करणार असल्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने केला आहे.

पुणे शहरातील सर्वात जुने आणि मोठे नाट्यगृह म्हणून बालगंधर्व रंगमंदिराची ओळख आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने विविध मराठी नाटक, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी बालगंधर्व रंगमंदिराची मोठी मागणी आयोजकांकडून होत असते. आठ वर्षापूर्वी या वास्तूचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यासाठी झालेल्या विरोधामुळे हे काम रखडले होते.

महापालिकेचे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर म्हणाले, बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचे काम वर्षभरात करण्याचे नियोजन आहे. यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहे. येथे पुरेशा सोयीसुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी कलाकार, नागरिकांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे हे नूतनीकरण आणि पुनर्विकासाचे काम करणे गरजेचे आहे.