पीएमपीची सेवा सुधारण्यासाठी प्रवाशांनी आपणहून सुरू केलेल्या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पीएमपीच्या सेवेबद्दल तक्रारी करण्यासाठी तसेच चांगल्या गोष्टींना दाद देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या अभियानात अवघ्या बारा दिवसात तब्बल तेवीसशे तक्रारी दाखल झाल्या आहेत. हे अभियान महिनाभर चालणार आहे आणि अभियानात काम करण्यासाठी उत्स्फूर्तपणे प्रवासी मित्रही पुढे येत आहेत.
पीएमपीची सेवा सुधारण्यासाठी पुण्यातील जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या अभियानामुळे पीएमपीच्या सेवेत कोणत्या सुधारणांची आवश्यकता आहे त्या बाबी पुढे येत आहेत. पीएमपीच्या सेवेबद्दल अनेक तक्रारी असून अगदी किरकोळ वाटणाऱ्या सुधारणाही पीएमपी करत नाही. किमान अशा सुधारणा केल्या तरी देखील प्रवाशांना दिलासा मिळेल, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, प्रशासनाकडून अशा तक्रारींचीही दखल घेतली जात नाही. यातून मार्ग काढण्यासाठी थेट प्रवाशांच्या सहभागातून पीएमपी सेवेत सुधारणा करण्याचे हे अभियान सुरू करण्यात आले आहे.
पीएमपी प्रवासी मंचने सुरू केलेल्या आणि शंभर दिवस चालणाऱ्या या अभियानात रोज शंभर याप्रमाणे दहा हजार तक्रारी नोंदवल्या जातील अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षातील प्रतिसाद मात्र खूपच मोठा आहे. अभियानाच्या पहिल्या बारा दिवसात तेवीसशेहून अधिक तक्रारी प्रवाशांनी केल्या असून कोणताही मोठा खर्च वा मोठी योजना न आखता त्यातील अनेक तक्रारींचे निराकरण सहजणे होऊ शकेल अशा या तक्रारी आहेत.
पीएमपीच्या गाडीत ज्या दाराने प्रवासी आत जातात त्या दारात मार्गाची पाटी नसते ही सार्वत्रिक तक्रार आहे. प्राप्त झालेल्या किमान पन्नास टक्के तक्रारी मागील दारावर पाटी नसते अशा आहेत. त्या बरोबरच बसमधील खिडक्या तुटलेल्या वा काचा फुटलेल्या आहेत, बसण्याची आसने तुटकी आहेत अशाही तक्रारींची संख्या मोठी आहे. पीएमपीच्या नियमानुसार प्रत्येक गाडीत तक्रार नोंदवण्यासाठीचा क्रमांक असलेली पाटी बंधनकारक आहे. मात्र अनेक गाडय़ांमध्ये अशा क्रमांकाची पाटी नाही किंवा पाटी असली, तरी त्यावर खाडाखोड करण्यात आली आहे, अशाही तक्रारी आहेत. चालकांसंबंधीही अनेक तक्रारी येत असून गाडी थांब्यावर (रस्त्याच्या कडेला) उभी राहात नाही, ती रस्त्याच्या मधोमध उभी केली जाते अशा तक्रारींचीही संख्या अधिक असल्याचे प्रवासी मंचचे विवेक वेलणकर यांनी गुरुवारी सांगितले.
पीएमपीच्या प्रवाशांना तक्रार नोंदवण्यासाठी पीएमपी हेल्पलाईनचा- ०२०- २४५०३३५५ (सकाळी सहा ते रात्री दहा) हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच ९८८१४९५५८९ या क्रमांकावर एसएमएस करूनही तक्रार नोंदवण्याची व्यवस्था आहे.