पुणे : रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तक्रार थेट नागरिकांना नोंदविता यावी आणि ७२ तासांत हे खड्डे दुरुस्ती केले जातील, या हेतुने पुणे महापालिकेने मोठा गाजावाजा करत सुरू केलेले ‘पीएमसी रोड मित्र’ हे मोबाईल अॅप सध्या बंद पडल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हे अॅप बंद असल्याबाबत महापालिका प्रशासनालाच माहिती नसल्याचेही यानिमित्त पुढे आले आहे.
शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तक्रार नागरिकांना करता यावी, यासाठी महापालिका प्रशासनाने ‘पीएमसी रोड मित्र’ ॲप तयार केले होते. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते १२ ऑगस्ट २०२५ ला अॅपचे अनावरण करण्यात आले होते. नागरिकांनी रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो किंवा व्हिडिओ काढून अॅपवर अपलोड केल्यास ते थेट पथ विभागाकडे पोहोचतील आणि ७२ तासांत खड्डे बुजवले जातील, असा दावा त्यावेळी प्रशासनाकडून करण्यात आला होता.
रस्त्यावर पडलेला खड्डा बुजवण्याची जबाबदारी संबंधित उपअभियंत्यावर निश्चित केली जाईल आणि काम पूर्ण झाल्यानंतर पूर्वी व नंतरचे फोटो अपलोड करून तक्रार बंद केली जाईल, अशीही व्यवस्था या अॅपमध्ये करण्यात आली होती. या अॅपच्या माध्यमातून नागरिकांकडून येणार्या तक्रारींचे निरीक्षण करण्यासाठी विशेष डॅशबोर्डही तयार करण्यात आला होता. कोणत्या क्षेत्रातून किती तक्रारी आल्या, त्या किती कालावधीत निकाली काढल्या याची माहिती वरिष्ठ अधिकार्यांना मिळणार होती.
या ॲपमुळे महापालिकेतील पथ विभागातील अधिकार्यांची जबाबदारी निश्चित होईल आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लागेल, असा दावा करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात हे अॅप काही काळानंतरच बंद पडल्याचे समोर आले आहे. अॅपवर तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केल्यास ते कार्यरत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांसाठी सुरू केलेला हा उपक्रम प्रत्यक्षात निष्क्रिय ठरल्याची टीका होत आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, महापालिकेने सुरु केलेले मोबाईल अॅप बंद असल्याचे समोर आले आहे. संबंधित विभागांना तत्काळ हे अॅप सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांसाठीहे अॅप लवकरच सुरु केले जाईल.
पथ विभागाच्या प्रमुखांना ॲप बंद पडल्याची माहितीच नाही
या अॅपवर किती तक्रारी आल्या आणि किती खड्डे बुजवले याबाबत विचारले असता पथ विभागाचे प्रमुख राजेश बनकर म्हणाले, ती माहिती आता क्षेत्रीय कार्यालयांकडे वर्ग केली आहे. मात्र, अॅप बंद असल्याचे सांगितले असता त्यांनी ॲप सुरूच असल्याचे सांगितले. यामुळे पथ विभागाचे प्रमुख याबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.
