पुणे : महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हातात असलेल्या स्थायी समितीच्या सदस्यपदी भारतीय जनता पक्षाने महिला सभासदांच्या झोळीत झुकते माप टाकले आहे. भाजपच्या वाट्याला आलेल्या १२ जागांपैकी ८ जागांवर पक्षाने महिला सदस्यांना संधी दिली असून चार पुरुष नगरसेवकांना समितीत सदस्य म्हणून संधी मिळाली आहे. यामुळे महापालिकेच्या स्थायी समितीत महिलाराज आणून दिग्गजांना धक्का देणार असल्याची चर्चा महापालिकेत सुरु झाली आहे.

महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक पूर्ण झाल्यानंतर स्थायी समितीसह इतर विषय समितीचे सदस्य निवडण्यासाठी शुक्रवारी महापालिकेची तहकूब सर्वसाधारण सभा झाली. महापौर मंजुषा नागपूरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेमध्ये स्थायी समितीच्या १६ सदस्यांसह शहर सुधारणा, विधी, महिला व बालकल्याण, क्रीडा, शिक्षण, तसेच नाव समितीच्या १३ सदस्यांची निवड करण्यात आली.

महापौरांच्या निवडीनंतर स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर संधी मिळावी, यासाठी अनेक इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे लावली होती. समितीमध्ये नियुक्त झालेल्या सदस्यामधूनच समितीचा अध्यक्ष नियुक्त केला जात असल्याने महापालिकेत दुसऱ्यांदा सत्ताधारी झालेल्या भाजपकडून पहिल्या वर्षी स्थायी समितीसाठी कोणाला संधी दिली जाणार याबाबत मोठी उत्सुकता आहे.

स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपमधील अनेक दिग्गज पदाधिकाऱ्यांच्या नावाची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. यामध्ये शहराध्यक्ष धीरज घाटे, ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, अनिल टिंगरे यांच्यासह महापौर पदासाठी इच्छुक असलेल्या महिला सदस्यांच्या नावाची चर्चा होती.

स्थायी समिती सदस्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत असलेल्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची नावांवर फुली मारत भाजपने फारशी चर्चेत नसलेल्या सदस्यांना संधी दिली आहे. संधी देण्यात आलेले बहुतांश सभासद हे दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. स्थायी समितीमध्ये १६ सदस्य असतात. महापालिकेत भाजपचे ११९ नगरसेवक विजयी झाले आहेत. त्यानुसार स्थायी समितीत भाजपच्या वाट्याला १२, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला तीन तर काँग्रेसला एक जागा मिळणार आहे. स्थायी समितीमध्ये १२ सदस्य नियुक्त करताना भाजपने पहिल्याच वर्षी केवळ ४ पुरुष सदस्यांना तर त्यांच्या दुप्पट म्हणजे ८ महिला सभासदांना सदस्य म्हणून संधी दिली आहे.

समितीमध्ये संधी देण्यात आलेल्या सभासदांमधूनच समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती केली जाते. भाजपने १२ पैकी ८ जागांवर महिलांना संधी देत अनेक जुन्या इच्छुकांना धक्का दिला आहे. समितीमध्ये असलेल्या एकूण १६ जागांपैकी ९ जागांवर महिला सदस्य देण्यात आले आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत देखील भाजप धक्कातंत्राचा अवलंब करुन कधीही चर्चेत नसलेले नाव अध्यक्षपदासाठी देणार का? याची जोरदार चर्चा महापालिकेत सुरु झाली आहे.

यांना मिळाली स्थायी समितीत संधी

  • रूपाली धाडवे (भाजप)
  • कालिंदा पुंडे
  • जयश्री भुमकर
  • रत्नमाला सातव
  • प्राची आल्हाट
  • मयुरी कोकाटे
  • मानवतकर निशा
  • वृषाली कामठे
  • श्रीनाथ भिमाले
  • विशाल धनवडे
  • दादा कोद्रे
  • संदीप बेलदरे
  • वैशाली बनकर (राष्ट्रवादी)
  • अमोल बालवडकर
  • सुहास टिंगरे
  • प्रशांत जगताप (काँग्रेस)