पुणे : जाहिरात फलकांसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावरून अतिरिक्त आयुक्त आणि स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्यात झालेली ‘चर्चा’ वादाच्या अंगाने गेली. एकीकडे महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असताना, सभागृहातच दुसरीकडे हा प्रकार घडला. मात्र, वाद झाल्याचे भिमाले यांनी नाकारले. महापालिकेला सादर झालेले प्रस्ताव आहेत तसे मान्य करण्यावरून काही खटके उडाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुणे महापालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष भिमाले आग्रही आहेत. उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी महापालिकेच्या मिळकतींची ३२ विभागांत विभागणी करण्यात आली असून, त्या ठिकाणी सुमारे ४ हजार २३ जाहिरातींसाठी जागा दिली जाणार आहे. या सर्व जागांसाठी एकच कंपनी नियुक्त केली जाईल. या प्रस्तावात सहभागी होण्यासाठी संबंधित कंपनीची जाहिरात व्यवसायातील उलाढाल किमान १०० कोटी रुपये असावी आणि ती सलग पाच वर्षे टिकून असावी, अशी अट आहे.

कंपनीकडून कोणतेही भाडे न आकारता, जाहिरातीतून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी ३० टक्के हिस्सा पालिकेला देण्याची अट आहे. त्यामुळे, संबधित कंपनीने तोटा दाखविल्यास अथवा कमी उत्पन्न दाखविल्यास महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे कंपनीने वर्षभरात किती ‘जीएसटी’ भरला, ही माहिती देणे बंधनकारक करण्याची अट प्रस्तावित करण्याचा विचार सुरू होता. त्याला भिमाले यांचा विरोध असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महापालिकेत सोमवारी सर्वसाधारण सभा सुरू असताना औचित्याच्या मुद्द्यावर सभासद भूमिका मांडत होते. त्या वेळी भिमाले हे महापौर, महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांशी बोलत होते. ‘या प्रस्तावात घातलेल्या अटींमुळे महापालिकेचे नुकसान होणार आहे. हा प्रस्ताव योग्य आहे. मात्र, काही अटी बदलण्याची गरज आहे,’ असा अभिप्राय महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडून दिला जाणार होता.

मात्र, ‘या अटींमध्ये कोणताही बदल न करता प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवा,’ असा भिमाले यांचा आग्रह होता. त्यामुळे, ‘या शहरात आम्ही सांगू तसेच होणार, नियम बदलता येणार नाही,’ असे भिमाले म्हटल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ‘ते जेथून आले होते, तेथे पुन्हा पाठविले जाईल,’ असा इशाराही भिमाले यांनी दिल्याचे तेथे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकारानंतर महापालिका आयुक्तांनीही भिमाले यांना प्रत्युत्तर दिले. वादाच्या अंगाने गेलेली ही चर्चा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पत्रकार कक्षात बसलेल्या पत्रकारांच्या निदर्शनासही आली. जाहिरात फलकांच्या प्रस्तावावरून हा प्रकार घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकाराला तेथे उपस्थित असलेल्या महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला. मात्र, असा कोणताही प्रकार झाला नसल्याचा दावा भिमाले यांनी पत्रकारांशी बोलताना केला.