थातूरमातूर कारवाईमुळे पालिका अडचणीत

महापालिका प्रशासनाकडून शुक्रवारपासून या बांधकामांवर कारवाई होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविल्याचा दावाही महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता.
पूररेषेत येणाऱ्या बांधकामांची सविस्तर माहिती पाटबंधारे विभागाकडे

निळी पूररेषा ‘गुगल मॅपिंग’च्या साहाय्याने निश्चित करताना नदीपात्रात आणि निळ्या पूररेषेत कोणती बांधकामे येतात, त्यांचे क्षेत्रफळ किती आहे याची सविस्तर यादी पाटबंधारे विभागाने महापालिकेला दिली असून त्यानुसार कारवाई झाली का, याची काटेकोर तपासणी महापालिकेच्या अहवालानंतर करण्यात येणार आहे. नदीपात्रातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने थातूरमातूर कारवाई केल्याचे दिसल्यास राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला (नॅशनल ग्रीन ट्रॅब्युनल-एनजीटी) प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पाटबंधारे आणि जलसंपदा विभागाने घेतली आहे. निळी पूररेषा निश्चित करताना अक्षांश आणि रेखांशही निश्चित झाल्यामुळे आणि पूररेषेत येणाऱ्या बांधकामांची लांबी-रुंदीनुसार सविस्तर माहिती पाटबंधारे विभागाकडे असल्यामुळे महापालिकेचे पितळ उघडे पडण्याची शक्यता असून कारवाईवरून महापालिका प्रशासनही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

डीपी रस्त्यावरील नदीपात्रातील आणि निळ्या पूररेषेतील बांधकामे चार आठवडय़ांत काढण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने जुलैच्या पहिल्या आठवडय़ात दिले होते. एनजीटीच्या या आदेशानंतर नदीपात्रातील बांधकामांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला होता. यापूर्वीही ही बांधकामे अनधिकृत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्थांकडून सातत्याने करण्यात येत होत्या. मात्र या बांधकामांवर जुजबी कारवाई करण्याव्यतिरिक्त प्रशासनाकडून काहीच ठोस कृती करण्यात आली नव्हती. त्यामुळे महापालिका प्रशासनाचे अनधिकृत बांधकामांना अभय असल्याचेही स्पष्ट झाले होते. एनजीटीच्या आदेशानंतर मात्र ही कारवाई होईल, अशी शक्यता होती. पण बांधकामांवर थेट कारवाई करण्यापेक्षा राडारोडा, माती आणि भरावावर कारवाई करण्याची तत्परता प्रशासनाने दाखविली होती. एनजीटीच्या आदेशानंतर काही मिळकतदारांनी अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविल्याचा दावाही महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र आता महापालिकेने कोणती कारवाई केली, याची तपासणी करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. या संदर्भात अनधिकृत बांधकामांची पाटबंधारे विभागाने केलेली यादी ‘लोकसत्ता’ला मिळाली आहे.

‘न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार महापालिकेच्या बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी नदीपात्राचे एकत्रित सर्वेक्षण केले होते. या पाहणी दरम्यान निळ्या पूररेषेचे मार्किंगही पाटबंधारे विभागाकडून करून देण्यात आले. गुगल मॅपिंगच्या साहाय्याने निळी पूररेषा निश्चित करताना त्यात आलेल्या बांधकामांचा नकाशाही पाटबंधारे विभागाकडून महापालिका प्रशासनाला देण्यात आला आहे. या अनधिकृत बांधकामांचे धरणापासूनचे अंतर, बांधकामाची लांबी-रुंदी याबरोबरच मिळकतदाराच्या नावाचा या यादीत समावेश आहे. त्यामुळे या यादीनुसारच महापालिका प्रशासनाकडून कारवाई होणे अपेक्षित आहे. कारवाई झाल्याचा अहवालही महापालिकेने देणे अपेक्षित आहे. या अहवालाचीही सत्यता प्रत्यक्षात जागेवर पाहणी करून तपासण्यात येईल. अपेक्षित कारवाई झाली नसल्यास राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार नाही, अशी ठाम भूमिका पाटंबधारे विभागाने घेतल्याची माहिती या विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिली.

महापालिका प्रशासनाकडून शुक्रवारपासून या बांधकामांवर कारवाई होत असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या तीनचार दिवसांमध्ये ४६ गाडय़ा भराव काढण्यात आला असून तो उरूळी देवाची येथे पाठविण्यात आला आहे.

प्रत्यक्षात बांधकामांवर कारवाई कधी होणार, याबाबत चालढकल होत असून मिळकतदारांनी स्वत:हून अनधिकृत शेड्स काढून टाकल्याचा दावाही करण्यात येत आहे. मात्र पाटबंधारे विभागाने ही भूमिका घेतल्यामुळे नक्की किती कारवाई झाली, कोणत्या बांधकामांवर झाली, याची माहिती पुढे येण्यास मदत होणार असून महापालिकेच्या अडचणीही वाढण्याची शक्यता आहे.

लाला, निळी रेषा निश्चित करण्याचे आदेश

नदीच्या डाव्या आणि उजव्या तीरावर शहरीकरण झाल्यामुळे  १९८९ मध्ये नद्यांची लाल आणि निळी रेषा निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार सन २०११ मध्ये मुठा नदीचे लाल आणि निळ्या रेषेचे रेखांकन करण्यात आले आहे. सन २०१६ मध्ये रेखांकन केलेल्या रेषेत अक्षांश आणि रेखांशासह काही दुरुस्त्या करून त्याबाबतचे नकाशेही महापालिकेला देण्यात आले आहेत. न्यायाधिकरणाच्या आदेशानंतर निळी पूररेषा ओळखण्यासाठी पाटबंधारे विभागाने मार्किंगही केले आहे. त्यामध्ये केवळ शेड्स, स्टॉल्स, पत्र्याचे बांधकामच नव्हे तर पूर्ण बांधकामेच निळ्या रेषेत असल्याचे दिसून येत आहे.

म्हात्रे पूल ते राजाराम पूल दरम्यानच्या निळ्या रेषेतील बांधकामांची माहिती

(पाटबंधारे विभागाच्या यादीतील माहिती)

*  मॅजेन्ठा हॉल- लांबी १०७ मीटर गुणिले रुंदी ३८.२० मीटर, मंडप पत्रा शेड

*   मिळकतधारक सावरकर- लांबी १०६ मीटर गुणिले रुंदी ३७.५० शेड

*   पुनवडी- लांबी १५ मीटर गुणिले रुंदी ८.२५ मीटर

*   मिळकतधारक सावरकर- लांबी २६.०० मीटर गुणिले रुंदी १५.०० मीटर

*   पंडित फार्म- गाडी पार्किंग जागा

*   पंडित फार्म- लांबी ४३ मीटर गुणिले १०७ मीटर शेड, २५ गुणिले १३० मीटर कंपाउंड, २५० फूट किचन शेड

*   पंडित फार्म- लांबी ९० मीटर गुणिले ६८.६० मीटर गार्डन लॉन

*   नितीन परताने फार्म- लांबी ४५.२० रुंदी गुणिले १५.७० मीटर

*   मंगेश गुजराती- २६ मीटर गुणिले १७ मीटर

*   सागर आमुंडेकर- लांबी २५.५० मीटर गुणिले रुंदी ८ मीटर गॅरेज

*   हार्वेस्ट क्लब, सिद्धी गार्डन- ४० गुणिले २० फूट लाकडी स्टेज, ग्राउंड फिलिंग पेव्हिंग ब्लॉक, ९९ मीटर गुणिले २१ मीटर कंपाउंड वॉल

*   प्रसाद बहिरट- लांबी २४ मीटर गुणिले रुंदी २१ मीटर पत्रा बांधकाम

*   तुषार बहिरट- लांबी २४ मीटर गुणिले रुंदी २१ मीटर पत्रा कंपाउंड आणि भिंतीचे बांधकाम

*   कृष्ण सुंदर गार्डन- लांबी ४७ मीटर गुणिले रुंदी २२ मीटर चार खोल्या तसेच पत्रा कंपाउंड

*   कृष्ण सुंदर गार्डन- लांबी ३५ मीटर गुणिले रुंदी १९ मीटर चार पत्राच्या खोल्या

*  सृष्टी मंगल कार्यालय- ७ मीटर गुणिले ४५ मीटर पत्रा शेड, ७.५० मीटर गुणिले ४.२० मीटर पत्रा कंपाउंड

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pmc to face problems for action taken against illegal structure

ताज्या बातम्या