पुणे : पुणे महापालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचविण्यासाठी, महापालिकेच्या शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षी महापालिकेच्या आठ शाळा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अभ्यासक्रमावर आधारित नव्याने सुरु केल्या जाणार आहेत.
पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी बुधवारी ही माहिती दिली. पुणे महापालिकेच्या २०२६–२७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात महापालिकेच्या शाळांच्या नवीन इमारती बांधणे तसेच दुरुस्तीच्या कामांसाठी सुमारे ६८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच शहरातील ७५ संकुलांमधील एकूण १४४ शाळा ‘मॉडेल स्कूल’ म्हणून विकसित करण्याची योजना आखण्यात आली आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगल्या सुविधा, आधुनिक शिक्षण साधने आणि शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
महापालिकेच्या शाळांच्या काही इमारती अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याने त्यांचे स्थलांतर करणे आवश्यक आहे. जून २०२६ पर्यंत अशा १५ शाळांचे स्थलांतर करणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यापैकी तीन शाळांचे स्थलांतर आधीच पक्क्या इमारतींमध्ये करण्यात आले असून काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात पत्र्याच्या शेडमध्ये वर्ग भरविण्याची तयारी प्रशासनाने दर्शवली आहे. मात्र धोकादायक स्थितीत असलेल्या शाळांच्या इमारतींमध्ये विद्यार्थ्यांना बसविले जाणार नाही, असेही प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
प्रशासकीय कामकाजामुळे मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा वेळ वाया जातो. त्याचा परिणाम मुलांना शिकविण्यावर होत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक शाळेत एक याप्रमाणे सुमारे ३०० डेटा एन्ट्री ऑपरेटर नियुक्त केले जाणार आहेत. तसेच शाळांचा परिसर आणि वर्गखोल्या स्वच्छ ठेवण्यासाठी ३०० स्वच्छता कर्मचारीही नियुक्त केले जाणार आहेत. या कामासाठी सुमारे ७ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. पालिका शाळांमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध केल्याने त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होऊन अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे, अशी माहितीही अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दिली.
१० ई-लर्निंग शाळा सुरु होणार
सीबीएसईशी संलग्न शाळांसह १० ई-लर्निंग शाळा सुरु करण्याची योजना महापालिकेने तयार केली आहे. सद्यस्थितीत महापालिकेच्या शहरात केवळ दोन ई-लर्निंग शाळा असून तेथे प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी पालकांचा चांगला प्रतिसाद मिळतो.
