पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या शहरी गरीब योजनेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. ‘अजितदादा पवार शहरी गरीब आरोग्य’ योजना असे या योजनेचे नाव करावे, असे पत्र महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे गटनेते निलेश निकम यांनी दिले आहे.
पुणे महापालिकेच्या वतीने शहरातील गरीब आणि गरजू कुटुंबातील नागरिकांसाठी २००९ पासून शहरी गरीब आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ही योजना राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी हजारो नागरिकांवर आरोग्य उपचार करण्यात आले आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत सत्तेत असताना राष्ट्रवादी कॉग्रेसच्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गेल्या आठवड्यात विमान अपघातामध्ये निधन झाले. त्यांच्या स्मृती निमित्त या योजनेचे नाव ‘अजितदादा पवार शहरी गरीब आरोगय योजना ‘ असे करावे, अशी मागणी महापालिका आयुक्त राम यांच्याकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन देखील राम यांना देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष सुनिल टिंगरे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, नगरसेविका रेखा टिंगेर, प्रिया गदादे, नगरसेवक हर्षवर्धन मानकर आदी उपस्थित होते.
या योजनेची मर्यादा देखील वाढविण्यात यावी, अशी मागणीही केली जात आहे. या योजनेत सध्या वार्षिक उत्पन्न एक लाख ६० हजार रुपये असलेल्या पुणेकरांना एक लाख रुपयांपर्यत उपचारासाठी अर्थसहाय्य दिले जाते. तसेच कर्करोगाचे (कॅन्सर) उपचार घेणाऱ्या रुणांसाठी ही मर्यादा दोन लाख रुपये अशी आहे. गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यावर वाढत असलेला खर्च लक्षात घेता या योजनेची उत्पन्नाची मर्यादा वाढवून तीन लाख करावी. तीन लाख उत्पन्न असलेल्या पुणेकर नागरिकांना उपचारासाठी दोन लाख रुपयांपर्यत अर्थसहाय्य करावे. तसेच कर्करोग, हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार ( किडनी) मेंदूविकार तसेच मज्जासंस्थेचे आजार असलेले पीडित रूग्णांना पाच लाख रपये अर्थसहाय्य करावे.
उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री म्हणून काम करताना अजित पवार यांनी नेहमीच नागरिकांचे प्रश्न, अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्य दिले आहे. नागरिकांची सेवा हीच खरी ईंश्वर सेवा असे मानणारे अजित पवार होते. त्यांचे नाव महापालिकेच्या शहरी गरीब योजनेला दिल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणेकरांच्चा वतीने खरी श्रध्दांजली ठरेल, असेही गटनेते निलेश निकम यांनी आयुक्त नवल किशोर राम यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

