पीएमपी मासिक पासची किंमत सरसकट चौदाशे रुपये | Loksatta

पीएमपी मासिक पासची किंमत सरसकट चौदाशे रुपये

हद्दीबाहेरील मार्गासाठीच्या प्रवाशांना शंभर रुपये कमी द्यावे लागणार आहेत.

पीएमपी मासिक पासची किंमत सरसकट चौदाशे रुपये
पीएमपी

महापालिका हद्दीत प्रवास करणाऱ्यांना दोनशे रुपयांचा भरुदड

पीएमपी प्रशासनाकडून महापालिका हद्दीतील मार्ग आणि हद्दीबाहेरचे मार्ग या दोन्हींसाठी मासिक पासची किंमत सरसकट चौदाशे रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील प्रवाशांना दोनशे रुपयांचा भरुदड बसणार आहे. महापालिका हद्दीतील प्रवाशांना मासिक पाससाठी एक हजार दोनशे रुपये तर, हद्दीबाहेरील मार्गासाठी पंधराशे रुपये मोजावे लागत होते. त्यामुळे हद्दीबाहेरील मार्गासाठीच्या प्रवाशांना शंभर रुपये कमी द्यावे लागणार आहेत.

पीएमपी संचालक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. पीएमपीचे दर, पासची रचना यांसह इतर विषयांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांबाबत पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. दरम्यान, यापुढे सर्व पास मी-कार्ड स्वरूपात देण्यात येणार आहेत.

विनातिकीट प्रवास, पीएमपी पासवर खाडाखोड करून गरवापर करणे प्रवाशांना यापुढे चांगलेच भोवणार आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शंभरऐवजी तीनशे रुपये दंड भरावा लागणार आहे. तर पासचा गरवापर केल्यास प्रतिदिन पाचशे रुपये दंड आकारला जाणार असून येत्या २१ ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

तसेच पीएमपी प्रशासनाच्या वतीने एचआयव्हीसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त असणाऱ्या नागरिकांना मोफत पास देण्यात येणार आहे. संबंधित विभागाच्या आयुक्तांनी पीएमपी प्रशासनाशी पत्रव्यवहार केला होता. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत एचआयव्हीग्रस्त रुग्णांना मोफत पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, जिल्हा शल्यचिकित्सकाचे आरोग्य प्रमाणपत्र असणाऱ्या संबंधित व्यक्तीला हा पास दिला जाणार आहे, अशी माहिती मुंढे यांनी दिली.

संचालक मंडळाच्या बठकीत पासच्या रचनेत बदल करण्यात आले. सर्वसाधारण मासिक पास सर्वासाठी एक हजार चारशे रुपये तर, दैनिक पास सत्तर रुपये करण्यात आला आहे. प्रशासकीय पासमध्ये पीएमपी सेवक कुटुंब पास, पीएमपीचे सेवानिवृत्त सेवक, पीएमपी सेवकांसाठी मोफत पास, भाडेतत्त्वावरील चालकांसाठीचा पास साडेतीनशे रुपये, पोलिसांसाठी शासन अनुदानित तर, विशेष उल्लेखनीय पास पीएमपीच्या वतीने मोफत देण्यात येणार आहे. महापालिका अनुदानित पासमध्ये महापालिका सेवक मासिक सर्वसाधारण पास सातशे रुपये, ज्येष्ठ नागरिक दैनिक पास चाळीस रुपये तर मासिक पास सातशे, सर्वसाधारण विद्यार्थी मासिक पास साडेसातशे रुपये, अंध, अपंग, वार्ताहर, मनपा, नगरसचिव कार्यालय सेवक, पाचवी ते बारावी महापालिका विद्यार्थी वार्षिक पास शंभर टक्के अनुदानित राहील. तसेच महापालिका शाळांव्यतिरिक्त पाचवी ते दहावीतील विद्यार्थी पास पंचाहत्तर टक्के अनुदानित करण्यात आले आहेत, अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-08-2017 at 03:22 IST
Next Story
कलेच्या माध्यमातून उत्तम राष्ट्रकारण शक्य – रवी परांजपे