पीएमपी सेवकांकडून अपेक्षित असलेले काम होत आहे का नाही याची अचानक तपासणी झाली असून या तपासणी मोहिमेमुळे सेवकांचे गैरप्रकार उजेडात येत आहेत. नेहरूनगर, हडपसर आणि शिवाजीनगर या तीन डेपोंमध्ये तसेच स्वारगेट येथील मध्यवर्ती यंत्रशाळेत करण्यात आलेल्या तपासणीत दोषी आढळलेल्या एकेशेचार सेवकांना शिस्तभंगाच्या कारवाईची नोटीस देण्यात आली आहे. पीएमपीचे अध्यक्ष डॉ. श्रीकर परदेशी यांच्या आदेशानुसार ही मोहीम सुरू आहे.
पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक या पदावर डॉ. परदेशी यांनी काम सुरू केल्यानंतर पीएमपी कार्यक्षम करण्यासाठी त्यांनी अनेकविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. या उपाययोजनांमुळे ऐंशी टक्के गाडय़ा मार्गावर आल्या आहेत. पीएमपीचे डेपो आणि मध्यवर्ती यंत्रशाळेतील कामकाज योग्य स्वरूपात चालावे यासाठी डेपोंची अचानक तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून त्यानुसार तेथे काम करणाऱ्या सर्व कामगारांना आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटीस देण्यात आली आहे. या तपासणीसाठी विविध विभागांमधील अधिकाऱ्यांचे एक पथक तयार करण्यात आले असून त्यांच्याकडून तपासणी केली जात आहे.
पिंपरीतील नेहरूनगर डेपोची अचानक तपासणी केली असता चार वाहकांच्या हजेरी पत्रकावर उपस्थितीबाबत नोंदी नसल्याचे आढळून आले. या डेपोत टाइम कीपर व अन्य विभागातील सेवकांच्या हजेरी पत्रावर साप्ताहिक सुटी वा कामाच्या अन्य नोंदी केल्याचे दिसले नाही. तसेच काही अधिकाऱ्यांचे हजेरी पत्रक मुख्य प्रवेशद्वारावर ठेवण्यात आलेले नाही असेही दिसून आले. तसेच तपासणीच्या दिवशी रजेचा अर्ज न देता बारा वाहक आणि दहा चालक गैरहजर असल्याचेही दिसले. एकूण सर्व गैरप्रकार लक्षात आल्यानंतर या डेपोच्या कामकाजावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून आले. त्यामुळे संबंधितांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली.
सोलापूर रस्त्यावर असलेल्या पीएमपीच्या हडपसर डेपोतही अचानक तपासणी करण्यात आली. या वेळी यंत्रशाळा विभागातील तीन सेवक कोणतीही नोंद न करताच आगाराबाहेर गेलेले दिसून आले. तसेच डिझेल पंपावरील कर्मचारीही अनुपस्थित असल्याचे दिसले. तपासणीच्या दिवशी एक्केचाळीस वाहक व सव्वीस चालक गैरहजर असल्याचे दिसून आले. शिवाजीनगर परिसरातील डेपोत सेवकांच्या हजेरीपत्रावरील नोंदींमध्ये त्रुटी आढळून आल्या. अशा एकसष्ट सेवकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.
पीएमपीचे मुख्य कार्यालय असलेल्या स्वारगेट येथे यंत्रशाळेत करण्यात आलेल्या तपासणीत एक सेवक कामावर गैरहजर होता आणि चार सेवक कामावर असतानाच झोपलेले आढळून आले. या कार्यालयातील नोंदीनुसार २०३ सेवक कामावर असणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात त्यातील १७ सेवक गैरहजर होते. त्यामुळे मध्यवर्ती यंत्रशाळेतील २१ सेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.