लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) येत्या तीन महिन्यांत प्रदूषणरहित सीएनजीवरील ६०० बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी सरकारी-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील ४०० बस पुढच्या महिन्यात (एप्रिल) पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत, तर स्वमालकीच्या २०० बस जून महिनाअखेरपर्यंत प्राप्त होतील, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना मोडक्यातोडक्या बस ऐवजी पर्यावरणपूरक आणि आरामदायी वातानुकुलीत बसमधून प्रवास करता येणार आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरएडीच्या हद्दीत पीएमपीकडून प्रवासी सेवा दिली जाते. त्यामध्ये ठेकेदारांमार्फत चालविल्या जाणाऱ्या बसचे आयुर्मान संपुष्टात आले आहे. त्यामुळे आत्तापर्यंत २५० पेक्षा जास्त बस ताफ्यातून कमी करण्यात आल्या आहेत. परिणामी, पीएमपीच्या ताफ्यातील बसची संख्या कमी झाली असून, स्वमालकीच्या १२ वर्षे जुन्या बस अद्यापही नाईलाजास्तव चालविल्या जात आहेत. त्यामुळे ताफ्यातील संख्या एक हजार ६५४पर्यंत आली आहे. त्यामुळे मार्गावर धावणाऱ्या बसच्या संख्येतही घट झाली आहे. याचा फटका प्रवाशांच्या सेवेवर होण्यास सुरुवात झाली. त्यानुसार गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत २०० स्वमालकीच्या आणि ४०० पीपीपी तत्त्वावरील बस घेण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार पीपीपी तत्त्वावरील ४०० सीएनजी बसच्या खरेदीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे, तर दुसरीकडे स्वमालकीच्या २०० बसच्या खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

पीएमपीच्या ताफ्यातील बस

स्वमालकीच्या – १००४ (नव्याने २०० येणार)
कंत्राटी बस – ९५०
पीपीपी तत्वावरील बस – ४०० नव्याने येणार
आयुर्मान संपलेल्या बस – ३२७

पीएमपीच्या ताफ्यातील स्वमालकीच्या आणि कंत्राटी पद्धतीवरील बसचे आयुर्मान संपुष्टात आले असून, अनेक बसची कालमर्यादा १२ वर्षांपेक्षा जास्त झाली आहे. नवीन बस ताफ्यात घेण्यासाठी कार्यवाही सुरू होती. तीन महिन्यांत पर्यावरणपूरक, वातानुकुलित सीएनजी आधारित ६०० बस ताफ्यात दाखल होणार असून, पुढच्या महिन्यात पीपीपी तत्त्वावरील ४०० बस ताफ्यात दाखल होतील. -दीपा मुधोळ मुंडे, व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष, पीएमपीएमएल