पीएमपीची सद्य:स्थिती लक्षात घेऊन पीएमपीच्या सेवेत सुधारणा करण्याचा कार्यक्रम हाती घेतला जात असून विविध मार्गावर तपासणी करण्याचे काम अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी त्यांचे नेहमीचे काम सांभाळून हे पाहणीचे काम करायचे आहे. पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव जाधव यांनी बुधवारी हे आदेश दिले. पुणे व पिंपरीत चाळीस अधिकारी हे काम करणार आहेत.
प्रशासकीय सुधारणा, शिस्तीची अंमलबजावणी आणि कार्यक्षमता यांचा अवलंब करून पीएमपीच्या सेवेत सुधारणा करण्याचा कार्यक्रम सुरू केला जात आहे. त्यासाठी नेमण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना पीएमपी गाडय़ांचे चालक, वाहक यांच्या कामाची तपासणी करण्याचे काम देण्यात आले आहे. गाडय़ा ठरलेल्या वेळापत्रकानुसार सुटत आहेत ना, बसथांब्यावर ज्या ठिकाणी गाडी थांबली पाहिजे त्याच ठिकाणी थांबत आहे ना, याची तपासणी अधिकारी करतील. तसेच जास्तीतजास्त प्रवासी घेण्याबाबतही सूचना देण्यात आल्या असून विनातिकीट प्रवाशांना दंड करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. पाहणीत ज्या ठिकाणी गैरप्रकार आढळतील अशा प्रकाराबाबत अधिकाऱ्यांना त्वरित अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांच्या पाहणीत जे चालक वा वाहक गैरप्रकार वा शिस्तभंग करताना आढळतील अशांवर विभागप्रमुखांनी कारवाई करावी, असेही सांगण्यात आले आहे. सकाळी सात ते दुपारी दोन आणि दुपारी तीन ते रात्री दहा या वेळेत ही तपासणी केली जाणार असल्याचे पीएमपीने कळवले आहे.