शहरातील बस स्थानके तसेच गर्दीच्या ठिकाणांहून नागरिकांकडील मोबाइल संच हिसकावणाऱ्या चोरट्यांना बंडगार्डन पोलिसांकडून अटक करण्यात आली. चोरट्यांकडून ३० मोबाइल संच जप्त करण्यात आले आहे.

दीपक गणेश गायकवाड (वय ४३, रा. मुंढवा), शहाबाज उर्फ सैफन रज्जाक शेख (वय ३०, रा. हडपसर), आदर्श नारायण गायकवाड (३१, रा. मुंढवा, मूळ, रा. सोलापूर) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पीएमपी थांब्यावर एका तरूणाचा मोबाईल हिसकावून चोरटे पसार झाले होते. या गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात येत होता. आरोपी लष्कर भागातील दस्तूर शाळेजवळील गल्लीत थांबल्याची माहिती बंडगार्डन पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी मोबाइल हिसकावण्याचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

चोरट्यांकडून ३० मोबाईल संच जप्त करण्यात आले असून मोबाईल चोरीचे ९ गुन्हे उघडकीस आले आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार, मोहन काळे, नितीन जगताप, सुधीर घोटकुले, अनिल कुसाळकर, अमोल सरडे, सागर घोरपडे आदींनी ही कारवाई केली.