पीएमपीने नुकतचे नवे मार्ग सुरू केले असून या नव्या मार्गाच्या माहितीसह पीएमपी वेळापत्रकाची माहिती प्रवाशांपर्यंत प्रभावीरीत्या पोहोचवावी, अशी मागणी पीएमपी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
पीएमपीतर्फे नऊ नवे मार्ग सुरू करण्यात आले आहेत. तसेच मार्गावर जास्तीत जास्त गाडय़ा आणण्याचेही नियोजन केले जात आहे. या पाश्र्वभूमीवर पीएमपी प्रवासी मंचतर्फे जुगल राठी आणि विवेक वेलणकर यांनी गुरुवारी पीएमपी प्रशासनाला निवेदन दिले आहे. पीएमपी प्रवाशांची संख्या वाढणे अपेक्षित असताना ती त्या प्रमाणात वाढलेली नाही. त्यामुळे प्रवाशांच्या गरजा व मागणी लक्षात घेऊन गाडय़ा सुरू ठेवण्याचे नियोजन करावे, अशी सूचना प्रवासी मंचतर्फे करण्यात आली आहे. नवे मार्ग सुरू केल्यानंतर त्या मार्गाची पूर्ण माहिती मार्गावरील सर्व थांब्यांवर प्रवाशांना समजेल अशा पद्धतीने प्रदर्शित करावी. या मार्गावर गाडय़ांच्या फेऱ्या किती वेळाने आहेत याची माहिती मार्गावरील गाडय़ांमध्ये लावावी, मार्गावरील सर्व मोठी दुकाने, शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय कार्यालये आदी ठिकाणी देखील ही माहिती प्रदर्शित करावी अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.
पीएमपीने सुरू केलेल्या नव्या मार्गाची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यामुळे प्रवासीसंख्या देखील कमी राहू शकते. त्यामुळे पुरेसे प्रवासी मिळत नसल्याच्या कारणाने नवे मार्ग व त्यावरील गाडय़ा बंद होऊ शकतात. त्यासाठी गाडय़ांचे वेळापत्रक प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था पीएमपी प्रशासनाने करावी, अशीही सूचना करण्यात आली आहे.