पुणे : शहरात सक्षम, सुलभ आणि स्वस्त सार्वजनिक प्रवासी सेवा देणे अपेक्षित असताना पीएमपीने तशी सेवा देण्याऐवजी वीजेवर धावणाऱ्या शंभर मोटारी घेण्याचा घाट घातला आहे. या निर्णयामुळे शहरातील खासगी वाहनांच्या संख्येत विनाकारण भर पडणार आहे. यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांना सेवा देण्याऐवजी मूठभर प्रवाशांना सेवा देणारी ही योजना कशासाठी राबविली जात आहे का, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. एका बाजूला मेट्रोची वेगवान सेवा उपलब्ध होणार असताना त्याला पूरक ठरेल, अशी सेवा देण्याऐवजी खासगी मोटारी वाढविणाऱ्या या निर्णयाला संचालक मंडळ मान्यता देणार का, याकडे लक्ष लागले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील किमान दहा लाख प्रवाशांसाठी पीएमपी प्रमुख सार्वजनिक सेवा आहे. पीएमपीची सेवा दर्जेदार, स्वस्त, सुलभ आणि सक्षम असावी, अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने केली जात आहे. मात्र सक्षम सार्वजनिक सेवेच्या नावाखाली पीएमपीकडून वाहतूक कोंडीला हातभार लावण्याचा उद्योग सुरू झाला आहे. ओला आणि उबेर या खासगी प्रवासी वाहतूकीच्या धर्तीवर पीएमपीनेही शंभर मोटारींद्वारे प्रवासी सेवा देण्याचा निर्णय घेतला असून स्वारस्य इरादापत्र (एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट) जाहीर केला आहे. तत्पूर्वी संचालक मंडळालाही त्याबाबतचे सादरीकरण पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दिवसरात्र ही सेवा देण्याचे प्रस्तावित असून ऑनलाइन नोंदणीबरोबरच थेट थांब्यावर जाऊनही मोटारीतून प्रवास करता येणार आहे. मार्केटयार्ड, पुणे रेल्वे स्थानक, विमानतळ असा गर्दीच्या ठिकाणी ही सेवा उपयुक्त ठरेल, असे पीएमपी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

With restrictions on the export of non basmati rice the demand from the domestic market also declined Pune news
आंबेमोहर, कोलमचे दर घसरले; जाणून घ्या, ग्राहकांना काय फायदा होणार ?
navi mumbai nmmt bus marathi news, nmmt digital boards marathi news
नवी मुंबई: बस थांब्यांवरील डिजिटल फलक बंद, एनएमएमटी बस प्रवाशांची मोठी गैरसोय
Navi Mumbai Municipality Expands Waste Management Scope Introduces waste e Transportation Syste
नवी मुंबई : लवकरच कचऱ्याची ई-वाहतूक सुविधा, कचरा वाहतूक व संकलनासाठी अखेर निविदा प्रसिद्ध
ow pressure water supply
दोन दिवस कमी दाबाने पाणी, मोरबे मुख्य जलवाहिनीवर आज १० तास देखभाल दुरुस्ती; नवी मुंबईसह कामोठे, खारघरलाही फटका

एकाचवेळी जास्तीत जास्त प्रवाशांना सेवा देणे हे पीएमपीचे प्रमुख काम आहे. मोठय़ा कंपन्यातील अधिकारी, नोकरदार ओला उबेर सारख्या प्रवाशी सेवेचा वापर करतात. असे प्रवासी या गाडय़ांमुळे पीएमपीकडे आकृष्ट होतील. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या सेवेच्या तोडीची सेवा पीएमपीकडून दिली जाईल, असा दावा पीएमपीच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. सुलभ, सुरक्षित आणि वाजवी दरात सेवा देण्याच्या उद्देशाला मात्र या नव्या संकल्पनेमुळे विसर पडला आहे. शहरातील खासगी वाहनांची संख्या ३६ लाखाहून अधिक आहे. सार्वजनिक सेवा सक्षम नसल्यानेच खासगी वाहनांची संख्या वाढत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. या परिस्थितीत शंभर मोटारी रस्त्यावर आणून पीएमपी कोणाचे हित साधत आहे, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

प्रवासी सेवा सुधारण्याचा दावा

पीएमपीच्या ताफ्यात वीजेवर धावणाऱ्या १५० गाडय़ा आहेत. याशिवाय मार्च अखेरीपर्यंत नव्याने काही गाडय़ा ताफ्यात दाखल होणार असून वीजेवर धावणाऱ्या (ई-बस) गाडय़ांची संख्या  पाचशेच्या घरात जाणार आहे. प्रवाशांना आरामदायी आणि वातानुकुलीत प्रवास करता यावा, यासाठी घेतलेल्या या गाडय़ांचीही दुरवस्था झाली आहे. ई-कॅबच्या वातानुकुलीत सेवेमुळे पीएमपीच्या सेवेचा दर्जा सुधारेल, असा दावा करण्यात आला आहे. स्वारस्य इरादापत्रानंतर मोटारी भाडेकराराने घ्यायच्या की नाही, याचा विचार होणार आहे. संचालक मंडळाच्या मान्यतेनंतर सेवेला प्रारंभ होणार आहे. 

आक्षेप काय ?

’  केवळ मोजक्या प्रवाशांना प्रवास 

’ मेट्रोची वेगवान सेवा मिळणार असताना पूरक सेवा का नाही

’ पीएमपी उभ्या करण्यास जागा नसताना मोटारींचे काय

’ थांबे सोडून मोटारी अन्यत्र उभ्या राहण्याची शक्यता

दावा काय ?

’ प्रदुषण नियंत्रणात

’ वेगवान प्रवास

’ इंधन बचत

’ सुरक्षित सेवा

पीएमपीच्या उद्देशालाच छेद देणारा निर्णय ; पीएमपी प्रवासी मंचची टीका

पुणे : सुलभ, स्वस्त, सक्षम आणि भरवशाची सेवा देण्याच्या पीएमपीच्या उद्देशाला वीजेवर धावणाऱ्या मोटारींच्या प्रस्तावाने छेद जाणार आहे. सामान्य प्रवासी केंद्रीत ठेवून वाहतूक देणे आवश्यक असताना  प्रवाशांच्या पैशातून पीएमपी मोजक्या लोकांना सेवा देणार असल्याने ही सेवा शाश्वत राहणार नाही, अशी टीका पीएमपी प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी यांनी केली आहे.

शंभर खासगी मोटारी घेण्याच्या पीएमपीच्या निर्णयासंदर्भात जुगल राठी यांनी ही टीका केली. बहुतांश नागरी प्रश्न वाहतुकीशी संबंधित असतात. सार्वजनिक सेवेत जास्तीत जास्त प्रवाशांची वाहतूक करणे अपेक्षित असते. मात्र प्रवासी केंद्रीत सेवा देण्याऐवजी वेग किंवा वाहनकेंद्रीत सेवा देण्याचे धोरण प्रशासनाचे आहे. त्यामुळेच गोंडस नावाखाली वाहनांची संख्या वाढविली जात आहे. यातून शाश्वत, भरवशाची सेवा कधीच शक्य नाही, असे राठी यांनी स्पष्ट केले. राठी म्हणाले की, ओला, उबेर या खासगी प्रवासी सेवांचा दर्जा वेगळा आहे. पीएमपीला तो साध्या होईल का, याबाबत शंका आहे. मुळातच सामान्य प्रवाशांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार नाही. ती काहीशी खर्चिक असणार आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांकडून त्याचा वापर कितपत होईल, याबाबतही संदिग्धता आहे. मार्गाचे सक्षमीकरण, दर काही मिनिटांनी बससेवा देणे पीएमपीने अपेक्षित आहे. मात्र त्याऐवजी भांडवली खर्च वाढविला जात आहे. या सेवेला प्रतिसाद मिळाला नाही तर तिकिट वाढविले जाईल. पीएमपी प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात प्रवासी भरडला जाईल. त्यामुळे सेवा उपयुक्त राहणार नाही. याऐवजी पीएमपीने सक्षम प्रवासी सेवा देण्यासाठी आवश्यक त्या ठोस उपाययोजना करणे अपेक्षित आहे.