पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यातील सरासरी ५० पेक्षा जास्त खासगी बस दररोज अचानक बंद पडत (ब्रेकडॉउन) असून, त्यात ई-बसची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून ‘पीएमपी’च्या ताफ्यातील खासगी बस रस्त्यावर अचानक बंद पडत असल्याचे चित्र आहे. या बाबत माहिती अधिकार कार्यकर्ते तुषार रत्नपाल यांनी ‘पीएमपी’कडे माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली होती. त्यावर ‘आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ९ हजार १३५, २०२३-२४ मध्ये ११ हजार ६६८, २०२४-२५ मध्ये १५ हजार ७१७, २०२५-२६ मध्ये १६ हजार ००१ आणि एप्रिल ते मे २०२६ दरम्यान ३ हजार ९७६ गाड्या ‘ब्रेकडाऊन’ झाल्या,’ अशी माहिती ‘पीएमपी’ प्रशासनाकडून देण्यात आली.
सध्या ‘पीएमपी’च्या ताफ्यात स्वमालकीच्या सुमारे ६८४ आणि १ हजार २७७ खासगी बस आहेत. सर्व ई-बस खासगी ठेकेदारांमार्फत चालविण्यात येतात. दिवसाला ५० पेक्षा जास्त खासगी बस बंद पडत आहेत. तर, ‘पीएमपी’च्या स्वमालकीच्या सरासरी १० गाड्या दररोज बंद पडत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
वर्ष… ब्रेकडाऊन गाड्या… ब्रेकडाऊन ई-बस
- २०२२-२३ – ९ हजार १३५… २ हजार ६८२
- २०२३-२४ – ११ हजार ६६८… ७ हजार ५५७
- २०२४-२५ – १५ हजार ७१७… ९ हजार ९९२
- २०२५-२६ – १६ हजार ००१… १० हजार ०३४
- एप्रिल ते मे २०२६ – ३ हजार ९७६… २ हजार ५५६
‘ब्रेकडाऊन’ची कारणे काय ?
पीएमपी बस ‘ब्रेकडाऊन’ होण्यामागील कारणे ‘पीएमपी’मधील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले, ‘बसची दर आठ दिवसांनी देखभाल आणि दुरुस्ती करण्यात येते. या कामानंतर दर चार दिवसांनी बसची पडताळणी केली जाते. गाडी पाचपेक्षा अधिक वेळा ‘ब्रेकडाऊन’ झाली, तर ती बंद ठेवून काम पूर्ण झाल्यानंतरच मार्गावर पाठवली जाते. १८ हजार किलोमीटरच्या प्रवासानंतर ‘डॉकिंग अपग्रेडेशन’ करण्यात येते. ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट’च्या मानकांनुसार सुमारे १० हजार किलोमीटर चालल्यानंतर ती ‘ब्रेकडाऊन’ होते. ‘पीएमपी’च्या बस दिवसाला सुमारे १८ तास प्रवास करतात. त्यात प्रवाशांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त असते. ११ लाख प्रवाशांसाठी २ हजारांहून कमी बस उपलब्ध आहेत. एका ई-बसमध्ये शंभर ते सव्वाशे प्रवासी असतात. दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे. ई-बसला तासन् तास एकाच जागेवर उभे राहावे लागते. त्यामुळे बॅटरी डिस्चार्ज होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता बीआरटी मार्ग काढून टाकण्यात येत आहेत. त्यामुळे पीएमपीला प्राधान्य राहणार नाही. गाड्यांना वाहतूक कोंडींतूनच मार्ग काढावा लागेल. गर्दी आणि यंत्रणेवरच्या ताणामुळे बसेस ब्रेकडाऊन होण्याचे प्रमाण वाढले आहे.’
‘पीएमपी’च्या ताफ्यात नवीन बस येत आहेत. मात्र, ‘ब्रेकडाऊन’च्या प्रमाणावरून ‘पीएमपी’ प्रशासनाचा ढिसाळ कारभार दिसतो. बॅटरी डिस्चार्ज किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे ई-बस बंद पडत असतील, तर त्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. रस्त्यात बस नादुरुस्त झाल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. बसच्या त्या मार्गावरील फेऱ्या रद्द होतात. त्याचा फटका प्रवाशांना बसतो. महापालिकेने ‘पीएमपी’बरोबर समन्वय साधून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारायला हवी. – तुषार रत्नपाल, माहिती अधिकार कार्यकर्ते
बस बंद पडल्यानंतर खासगी ठेकेदारांवर नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येते. मात्र, वाढलेली वाहतूक कोंडी, गर्दीचा ताण आदी कारणांमुळे ‘ब्रेकडाऊन’चे प्रमाण वाढले आहे. आता बसची संख्याही वाढवण्यात येत आहे. – ॲलिस पोरे, सह-व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ
सवलतीच्या बस पाससाठी योजना
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून ‘सवलतीचे बस पास सुविधा आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ‘पीएमपी’चे पथक शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्थांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांना सवलतीच्या बस पासबाबत माहिती देत असून, विद्यार्थ्यांना जागेवरच पास देण्यात येत आहेत. यापूर्वी विद्यार्थी, पालकांना बस पास मिळविण्यासाठी ‘पीएमपी’च्या पास विभागात जावे लागत होते. मात्र, ही सेवा थेट शैक्षणिक संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय कमी होत असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी शैक्षणिक संस्था-शाळा, महाविद्यालयांनी ‘पीएमपी’च्या पास विभागाशी ०२०-२४५०३२३६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
