पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात ५० टक्के सवलत देण्यात येणार असून, रविवारपासून (१ नोव्हेंबर) ज्येष्ठांना अर्ध्या तिकीटात प्रवास करता येणार आहे.
‘पीएमपी’च्या संचालक मंडळाच्या मान्यतेने हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए कार्यक्षेत्रात बस सेवा दिली जाते. या सेवेचा वापर करणाऱ्या ६० वर्षे आणि त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना ही सवलत लागू होणार आहे.
यापूर्वी ‘पीएमपी’कडून दैनिक पासमध्ये सवलत ज्येष्ठांना सवलत देण्यात आली होती. ज्येष्ठांसाठी ७० रुपयांचा दैनिक पास ५० टक्के सवलतीत म्हणजे, ३५ रुपयांमध्ये देण्याची योजना सुरू करण्यात आली होती. आता त्याबरोबरच थेट तिकिटामध्ये ५० टक्के सवलत लागू करण्यात आली आहे.
आता ज्येष्ठ नागरिकांना ‘पीएमपी’ने प्रवास कार्यासाठी पूर्ण तिकीट काढावे लागणार नाही. त्यांना निम्मे तिकीट आकारले जाणार असून, ‘पीएमपी’च्या सर्व बस मार्गांवर ही सवलत देण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे रोजचा प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. दवाखाना, बाजार, नातेवाईकांकडे जाणे-येणे यासाठी बसचा वापर करणाऱ्या ज्येष्ठांची संख्या मोठी आहे. त्यांना सार्वजनिक वाहतूक अधिक किफायतशीर दरात उपलब्ध होणार असल्याचा विश्वास पीएमपी प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी वयाची ६० वर्ष पूर्ण केल्याचा पुरावा बरोबर असणे आवश्यक आहे. त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा महामंडळाचे ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. आधार कार्डवर पूर्ण जन्मतारीख असणे अनिवार्य आहे. केवळ जन्मवर्ष असलेले आधार कार्ड चालणार नाही, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
‘या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन तिकीट भाड्यात दिलासा मिळणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन ‘पीएमपी’च्या मुख्य वाहतूक व्यवस्थापकांनी निवेदनाद्वारे केले आहे.
