पुणे : शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पुणे महानगर परिवनहन मंडळाला नव्या बसची गरज आहे. त्यासाठी दीड वर्षांपूर्वीच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) २३० कोटी रुपये दिले. मात्र, ठराव-वाटाघाटी-निविदा-कार्यक्षमता चाचणी-करार-फेरतपासणी-बदल या तांत्रिक कारणांमुळे ‘पीएमपी’ला निधी असूनही बससाठी वाटच पाहावी लागत आहे.
‘पीएमपी’ने सुमारे १३ लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. शहरातील सार्वजनिक वाहतुकीवरील हा ताण कमी करण्यासाठी गेल्या वर्षी २५ मार्च २०२५ रोजी ‘पीएमपी’च्या संचालक मंडळाने नवीन बस खरेदीचा ठराव मांडला. याच बैठकीत ‘पीएमआरडीए’ने नवीन ५०० बसेस खरेदी करण्यासाठी ‘पीएमपी’च्या खात्यात २३० कोटी रुपये वर्ग केल्याचे सांगण्यात आले. संचालक मंडळाच्या इतिवृत्तात ही माहिती देण्यात आली आहे.
‘पीएमपी’कडून नवीन एक हजार बस खरेदी करण्यात येत आहेत. त्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेबरोबरच ‘पीएमआरडीए’कडून निधी देण्यात येणार आहे. त्यातील ५०० बस खरेदी करण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने २३० कोटी रुपये दिले. दीड वर्षांपूर्वीच निधी मिळाला. ठराव मांडण्यात आले. प्रत्यक्षात एकही नवीन बस रस्त्यावर धावत नाही.
या बाबत ‘पीएमपी’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड म्हणाले, ‘बस खरेदी करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. प्रत्यक्षात बस येण्यासाठी आवश्यक त्या चाचण्या, पडताळणी पूर्ण करण्यात येत आहे. पैसे मिळाल्यानंतरही खरेदीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही वेळ लागतो. ही प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी, म्हणून प्रयत्न करण्यात आले.’
आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही वेळ लागतो. आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, या वर्षी डिसेंबरअखेर नवीन ५०० बसचा ‘पीएमपी’च्या ताफ्यात समावेश होणे अपेक्षित आहे. उरलेल्या ५०० बसेस टप्प्याटप्प्याने; पण लवकरच मिळतील. ‘पीएमआरडीए’कडून मिळालेला निधी दुसरीकडे कुठेही वर्ग करण्यात आलेला नाही. ते पीएमपीच्या बँक खात्यात आहेत. त्याचे व्याज मिळत असून, अतिरिक्त खर्च होऊ नये म्हणून खबरदारीही घेण्यात आली.- महेश आव्हाड, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
निधीअभावी समाजहिताचे प्रकल्प रखडल्याचे नित्याचेच आहे. पण, निधी असूनही केवळ तांत्रिक कारणांमुळे बस खरेदी रखडल्याचे हे पहिलेच उदाहरण असेल. बसची संख्या कमी असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते, हे ‘पीएमपी’च सांगते. मात्र, त्यांच्यात बसची संख्या वाढविण्याची इच्छाशक्तीच नाही. त्यामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.- तुषार रत्नपाल, नागरिक
‘आयटीएमएस’साठी फेरप्रक्रिया
‘बस खरेदीसाठीच्या पहिल्या ठरावात यापूर्वीच्या अध्यक्षांनी डिजिटल डिस्प्ले बोर्ड, लाईव्ह ट्रॅकिंग, स्मार्ट कम्युनिकेशन सिस्टीम आदींचा समावेश असलेली इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) बसवण्याचा उल्लेख वगळला होता. त्यासाठी पुन्हा नव्याने प्रक्रिया करावी लागली. नव्या बदलांसाठी संचालक मंडळाची पुन्हा मंजुरी घेण्यात आली,’ असेही ‘पीएमपी’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी सांगितले.
