जकातनाक्यांच्या सर्व जागा रिकाम्या झाल्या असून त्या जागा बळकवण्यासाठी अनेक ठिकाणी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे या जागा महापालिकेने लवकरात लवकर डेपो, वर्कशॉप, थांबे, पास केंद्र आदींसाठी पीएमपीला द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
जकात बंद झाल्यानंतर सर्व जकातनाक्यांच्या जागा रिकाम्या झाल्या आहेत. या जागांचा कोणताही वापर सध्या केला जात नाही. यापैकी काही जागांवर अतिक्रमण तसेच बेकायदेशीर पार्किंग सुरू झाले असून काही जागा बळवकण्यासाठी तेथे वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे या जागा पीएमपीला द्याव्यात, या मागणीचे पत्र पीएमपी प्रवासी मंच या संस्थेतर्फे महापौर तसेच आयुक्तांना देण्यात आले आहे.
पीएमपीच्या शेकडो गाडय़ा रात्री अनेक मुख्य रस्त्यांवर उभ्या केल्या जातात. त्यामुळे या गाडय़ांमधून डिझेल चोरी होते. तसेच सुटय़ा भागांच्याही चोऱ्या होतात. गाडय़ांची मोडतोड केली जाते. या प्रकारांमुळे गाडय़ांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होते. पीएमपीला पुरेशी वर्कशॉप सुरू करता येत नसल्यामुळे सुमारे सातशे नादुरुस्त गाडय़ा मार्गावर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे रोज लाखो प्रवाशांची गैरसोय होते. तसेच पुरेशा गाडय़ा मार्गावर येत नसल्यामुळे पीएमपीचा तोटाही वाढत आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन जकातनाक्यांच्या जागा लवकरात लवकर पीएमपीला द्याव्यात, अशी मागणी संस्थेने या पत्रातून केली आहे.