१० रुपयांत पीएमपीचा दिवसभर प्रवास योजना लवकरच; योजनेसाठीच्या गाडय़ा ताफ्यात दाखल

पुणे : सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने अंदाजपत्रकात प्रस्तावित के लेली ‘मध्यवर्ती भागात दहा रुपयांत पीएमपीचा वातानुकूलित प्रवास’ ही योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे. योजनेसाठी ५० मिडी गाडय़ा खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली असून या गाडय़ा पीएमपीच्या चाकण येथील कार्यशाळेत दाखल झाल्या आहेत. टाळेबंदीचा कालावधी संपल्यानंतर ही योजना सुरू होण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी मध्यवर्ती भागात अवघ्या दहा रुपयांमध्ये पीएमपीचा दिवसभर प्रवास करता यावा, अशी योजना स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी अंदाजपत्रकात मांडली होती. त्या दृष्टीने फेब्रुवारी महिन्यात महापालिकेच्या स्थायी समितीने ५० मध्यम आकाराच्या (मिडी बस) गाडय़ा खरेदी करण्यास मान्यता दिली होती. पीएमपीकडून ही प्रक्रिया राबविण्यात आली असून ५० गाडय़ा दाखल झाल्या आहेत. या सर्व गाडय़ा वातानुकूलित आहेत.  या गाडय़ांची पाहणी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी केली. येत्या काही दिवसांत ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे रासने यांनी सांगितले.

मध्यवर्ती भागातील अरुंद रस्ते, दाट लोकवस्तीचा भाग याचा विचार करून ही योजना हाती घेण्यात आली आहे. दहा रुपयांमध्ये दिवसभर काही मार्गावर प्रवाशांना दिवसभर प्रवास करता येणार आहे. डेक्कन ते पूलगेट, स्वारगेट ते पुणे रेल्वे स्थानक, स्वारगेट ते शिवाजीनगर आणि स्वारगेट- पुणे रेल्वे स्थानक मार्गे पूलगेट ( मार्गे टिळक रस्ता- खजिना विहीर-अप्पा बळवंत चौक) असे मार्ग योजनेसाठी निश्चित करण्यात आले आहेत. टप्प्याटप्प्याने योजनेचा विस्तार शहराच्या सर्व विभागात करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी येत्या काही महिन्यात २५० ते ३०० मध्यम आकाराच्या गाडय़ांची खरेदी करण्यात येणार आहे. २६ लाख ९५ हजार रुपयांना एक गाडी याप्रमाणे ५० गाडय़ांसाठी एकू ण १३ कोटी ४० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. शहरातील लोकसंख्येचा विचार करता साडेतीन हजार गाडय़ांची आवश्यकता आहे. पेठांमध्ये खासगी वाहने कमीत कमी संख्येने यावीत आणि वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

पाच रुपयांत पाच किलोमीटर प्रवासाला प्रतिसाद

पीएमपीच्या अटल बस सेवेअंतर्गत पाच रुपयांमध्ये पाच किलोमीटर अंतरापर्यंतचा प्रवास ही योजना सुरू करण्यात आली आहे. सध्या करोना संसर्गामुळे सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्यात आली असली, तरी योजनेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याची वस्तुस्थिती आहे. पुणे रेल्वे स्थानक, स्वारगेट, शिवाजीनगर, महापालिका मुख्य भवन, पूलगेट अशा महत्त्वाच्या स्थानकांवरून सरासरी तीन ते सहा किलोमीटर अंतरावरील ९ मार्गावर ही सेवा देण्यात येत होती. या योजनेचीही व्याप्तीही वाढविण्यात येत असून अनेक नवे मार्ग सुरू करण्याचे प्रस्ताव पीएमपी प्रशासनाकडे देण्यात आले होते.

आकर्षक रंगसंगती

योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या गाडय़ांची रंगसंगती आकर्षक असून त्या गुलाबी रंगाच्या आहेत. नैसर्गिक इंधनावर त्या धावणार आहेत. पीएमपीकडून या गाडय़ांची चाचणी के ली जाणार असून चाचणी प्रक्रिया आणि आवश्यक परवानगीनंतर गाडय़ांचे उद्घाटन करण्याचे नियोजित आहे.