पुणे : नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण, अपघातांचे नेमके कारण शोधण्यासाठी पुणे महानगर परिवहन मंडळाच्या (पीएमपी) सर्व बसमध्ये ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ आणि ‘डॅश कॅम’ बसवणार असल्याची माहिती ‘पीएमपी’चे व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी रविवारी दिली.
सजग नागरिक मंचाच्या वतीने आयोजित मासिक चर्चासत्रात ते बोलत होते. ‘पीएमपी’च्या सह-व्यवस्थापकीय संचालक अॅलिस पोरे, मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, जुगल राठी, संजय शितोळे आदी या वेळी उपस्थित होते. आव्हाड म्हणाले, ‘‘पीएमपीएमएल’च्या गाड्यांचे वर्षाला सुमारे १० प्राणांतिक अपघात होतात. पोलीस अनेकदा मोठ्या वाहनचालकाला जबाबदार धरून गुन्हा नोंदवतात. मात्र, अनेकदा अपघातांमध्ये त्या वाहनचालकाचा दोष नसतो. ‘डॅश कॅम’मुळे अपघाताचे नेमके कारण समोर येईल. तसेच, सीसीटीव्हीमुळे सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबवणे आदी बेशिस्त वर्तनावरही लक्ष ठेवता येईल.’
‘दिवसाला दोन हजारांहून अधिक प्रवासी असलेल्या मार्गांवर बसची संख्या वाढवण्यात येणार आहे. मागणीनुसार बस देण्याचा विचार आहे,’असेही त्यांनी सांगितले.
आव्हाड म्हणाले,‘रेल्वे स्थानक, विमानतळ, एसटी आणि मेट्रोतून उतरणाऱ्या प्रवाशांना लवकरात लवकर इच्छित स्थळापर्यंत जाण्यासाठी बसची संख्या आणि वारंवारिता वाढवण्यात येणार आहे. तसेच, प्रवाशांना बस आणि मेट्रोसाठी वेगळे तिकीट काढावे लागू नये म्हणून, ‘वन नेशन वन कार्ड’ धर्तीवर प्रयत्न करण्यात येत आहेत.’
‘साडेसात हजार थांब्यांचा कायापालट’
‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पीएमपीचे ९ हजार थांबे आहेत. त्यातील केवळ दीड हजार थांब्यांवर छप्पर आहे. उर्वरित साडेसात हजार थांबे ‘एक पोल आणि पाटी’ अशा अवस्थेत आहेत. आता सार्वजनिक-खासगी भागीदारीतून या थांब्यांचा कायपालट करणार असून, हायटेक थांब्याच्या बदल्यात त्या कंपनीला १५ वर्षांसाठी जाहिरातीचे अधिकार देण्यात येतील,’ अशी माहिती महेश आव्हाड यांनी दिली.
‘हे थांबे सौर ऊर्जेवर चालणारे असतील. प्रत्येक थांब्यावर दोन सीसीटीव्ही कॅमेरे, ध्वनिक्षेपक यंत्रणा आणि बसचे वेळापत्रक दाखवणारे डिजिटल माहितीफलक असतील. कचऱ्याचे डबे आणि शक्य झाल्यास पिण्याच्या पाण्याची सोयही बस थांब्यांवर उपलब्ध करून देण्याचा विचार आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.
पुणेकरांच्या मागण्या
– मार्गांवरच बस बंद पडण्याचे प्रमाण शून्य
– बीआरटी मार्गिका सुरू करावी
– चढ-उतार करण्यासाठी सहज-सुलभ-सुरक्षित व्यवस्था
– थांब्यांवर बसचे वेळापत्रक दाखवणारे डिजिटल बोर्ड, उद्घोषणा
– विद्यार्थी, कामगारांना विशेष सवलत
– शाळा-महाविद्यालये आणि कंपन्यांजवळ थांबे
– पासची व्यवस्था अधिक सुकर, दैनिक पास ५० रुपये आणि साप्ताहिक पासचीही सोय
– प्रत्येक तक्रारीचे निराकरण आणि त्याची पडताळणी – प्रवाशांच्या गरजेप्रमाणे, गर्दीप्रमाणे बदलणारी सेवा, गर्दीच्या मार्गांवर विनाथांबा किंवा कमी थांब्याच्या बस
