पुणे : पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या ‘पीएमपी’मध्ये दर वर्षी वाढत असलेली तूट, बसची दुरवस्था, जाहिरांतीतून न मिळणारे उत्पन्न, भरती आणि पदोन्नती प्रक्रियेतील अनियमितता, तुटीच्या पैशांतून व्यवस्थापकीय संचालकांसाठी नव्याने खरेदी केली जाणारी गाडी, असे विविध प्रश्न सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्यात आले.पुणे महापालिकेत झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी पीएमपी प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार केला. सभेसाठी उपस्थित असलेले ‘पीएमपी’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांना धारेवर धरले. बसची दुरवस्था, कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधा, जाहिरात उत्पन्न अशा प्रश्नांवरुन पीएमपी प्रशासनाला जाब विचारण्यात आला.

‘सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात ‘पीएमपी’चा वापर करतात. मात्र, ‘पीएमपी’च्या कारभारातील त्रुटींमुळे प्रवासी हतबल झाले आहेत. ‘पीएमपी’ प्रशासनाकडून नियोजन आणि संचालन योग्य पद्धतीने होत नसल्याने दर वर्षी तूट वाढत चालली आहे. नागरिकांच्या करांतून महापालिका ‘पीएमपी’साठी निधी देते. मात्र, किरकोळ अपघात झाल्यानंतर अध्यक्षांसाठी थेट नवीन वाहन खरेदी करण्यात आले. विमा संरक्षण असताना जुने वाहन दुरुस्त करून वापरता आले असते. ही पैशांची उधळपट्टी असून, त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे,’ अशी मागणी नगरसेवक हरिदास चरवड यांनी केली.

‘पीएमपी’ची संचालन तूट वाढत असून, भरती प्रक्रियेतील अनियमितता आणि त्याच्या चौकशी अहवालाबाबत पृथ्वीराज सुतार यांनी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, ‘महापालिका दर वर्षी कोट्यवधी रुपयांची संचालन तूट मंजूर करते. मात्र, निधी देण्यापूर्वी ‘पीएमपी’च्या खर्चाचे सखोल लेखापरीक्षण केले पाहिजे.’

सुभाष नानेकर यांनी ‘पीएमपी’ कर्मचाऱ्यांच्या आरोग्य योजनेचा मुद्दा उपस्थित केला. ‘कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात होत असतानाही रुग्णालयांची थकबाकी न भरल्याने पॅनेलवरील रुग्णालयांमध्ये उपचार दिले जात नाहीत. बस थाब्यांवर बेकायदा भाजी विक्री केंद्रे सुरू झाली आहेत. त्याकडे ‘पीएमपी’ प्रशासन डोळेझाक करते.’ पुनीत जोशी म्हणाले, ‘पीएमपी बसथांब्याची स्थिती दयनीय झाली आहे. बेकायदा पद्धतीने बसस्टॉप आणि बसवर जाहिराती केल्या जातात. यामुळे हक्काचे उत्पन्न बुडते याकडे लक्ष देण्याची गरज आहे.’

माजी महापौर वैशाली बनकर यांनी बसच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. एका कंत्राटी बसचे दरवाजे न उघडल्याने प्रवाशांना चालकाच्या दरवाजातून बाहेर पडावे लागल्याचा प्रकार सभागृहासमोर मांडला. बसची नियमित तपासणी होते का, असा प्रश्नही त्यांनी मांडला. ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी बसचा भरधाव वेग, नियमांचे उल्लंघन आणि बसथांब्यांवर वेळापत्रक नसल्याचा मुद्दा उपस्थित केला.

बसच्या देखभाल-दुरुस्तीतील त्रुटी, वातानुकूलित बसमधील बिघाड, निकृष्ट दर्जाचे सुटे भाग वापरले जात असल्याचा आरोप महेश वाबळे यांनी करून बसथांब्यांवरील जाहिरातीतून उत्पन्न वाढविण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, अशी विचारणा केली. तर, अहिल्यानगर रस्त्यावरील बीआरटी हटविल्यानंतर तेथे पुन्हा ‘पीएमपी’ बसथांबे सुरू करण्याची मागणी ऐश्वर्या पठारे यांनी केली. शववाहिकांची संख्या वाढविणे, महिला सुरक्षेवर अधिक भर देणे आणि शहराच्या हद्दीबाहेरील सेवांपेक्षा पुणे-पिंपरी-चिंचवडमधील सेवा सक्षम करण्याची मागणीही सभेत करण्यात आली.

‘पदोन्नतीसाठी रेट कार्ड’

आचारसंहितेच्या काळात ‘पीएमपी’मध्ये करण्यात आलेल्या पदोन्नतींवरही सभेत प्रश्न उपस्थित करण्यात आले. विविध पदांसाठी ‘रेट कार्ड’ ठरवून सुमारे २५० कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्याचा आरोप अजित घुले यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल सभागृहात सादर करण्याची मागणी त्यांनी केली.