पिंपरी: पिंपरी पालिका हद्दीतील शेवटचे गाव असलेल्या किवळे येथील मुकाई चौकात सात वर्षांपूर्वी पीएमपीसाठी सुसज्ज बीआरटीस बस टर्मिनल उभारण्यात आले. त्यासाठी महापालिकेने लाखो खर्च केले आहेत. मात्र, या बस टर्मिनलचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याचे दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किवळे बस टर्मिनलच्या आसपास दाट लोकसंख्येचा भाग आहे. येथील नागरिकांना पिंपरी-चिंचवड तसेच पुण्यातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी सोयीचे व्हावे म्हणून या ठिकाणी बस टर्मिनल उभारण्यात आले. पालिकेकडून पीएमपीला दरवर्षी कोट्यवधी देऊनही आणि बस मार्गांवर सोयीसुविधांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही शहरातील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. हे पीएमपीचे अपयश आहे, अशा आशयाचे पत्र चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी पीएमपी प्रशासनाला दिले आहे.

किवळे, मुकाई चौक येथून पुणे मनपाभवन आणि निगडी या दोनच मार्गावर बस उपलब्ध आहेत. मुकाई चौकापासून चौफेर असलेल्या रावेत, किवळे, मामुर्डी, साईनगर, दत्तनगर, उत्तमनगर, भीमाशंकरनगर इत्यादी दाट वस्तीच्या भागातील नागरिकांसाठी पीएमपी प्रशासन फिडर रुटसुद्धा सुरू करू शकलेले नाही. त्यामुळे येथील नागरिकांची सार्वजनिक प्रवासासाठी प्रचंड गैरसोय होत आहे. खासगी वाहने आणि रिक्षाने प्रवास करून या नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. पिंपरी पालिका पीएमपीला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे अनुदान देते. बस मार्गांवर सोयीसुविधा उभे करण्यासाठी स्वतःचे कोट्यवधी रुपये खर्च करते. एवढा खर्च करूनही पिंपरी-चिंचवडमधील जनतेला चांगली सार्वजनिक सुविधा पुरवली जात नसल्यास ते पीएमपी प्रशासनाचे अपयशच आहे.

पिंपरी पालिकेचे पैसे घेता, तर शहरवासियांना चांगल्या प्रवासी सुविधा द्या. किवळे बस टर्मिनलचा पूर्ण क्षमतेने वापर करावा, अशी मागणी आमदार जगताप यांनी पीएमपी प्रशासनाला केली आहे.

किवळे येथील मुकाई चौकात सप्टेंबर २०१५ मध्ये सुसज्ज बस टर्मिनल सुरू करण्यात आले. औंध-सांगवी फाटापासून ते किवळे या मुख्य बीआरटीएस रस्त्याच्या शेवटच्या टोकाला हे बीआरटीएस बस टर्मिनल आहे. त्यावर पिंपरी पालिकेने लाखो रुपये खर्च केले. मात्र, गेल्या सात वर्षात बस टर्मिनलचा योग्यरित्या वापर होत नाही. किवळे ते पुणे विमानतळ, किवळे ते स्वारगेट, देहूरोड ते हिंजवडी फेज-३, किवळे ते आळंदी, किवळे ते चाकण एमआयडीसी, देहूरोड ते पिंपरीगाव या मार्गावर बस पूर्ववत सुरू करण्यात यावी.

लक्ष्मण जगताप, आमदार, चिंचवड

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmpml bus depot not in use constructed before seven years pune print news zws
First published on: 19-08-2022 at 15:26 IST