पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) शहरातील ८६५ स्टेनलेस स्टील बसथांबे आणि १० बस आगारांवर जाहिरात करण्यासाठी देण्यात आलेल्या निविदेमुळे ‘पीएमपी’चे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी दिला आहे.

हे काम तातडीने रद्द करण्याची मागणी मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी केली. याबाबतचे निवेदन संभूस यांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांना दिले.

“पीएमपी’च्या थांब्यांवर जाहिरात करण्यासाठी निविदा मागविण्यात आली. या कामासाठी नियमानुसार किमान तीन निविदा येणे आवश्यक होते. मात्र, एकाच ठेकेदाराची निविदा मंजूर करण्यात आली. निविदेच्या अटींनुसार प्रत्येक थांब्यासाठी किमान १२ हजार रुपये भाडे येणे अपेक्षित होते. मात्र, पीएमपीच्या संचालक मंडळाने केवळ ७ हजार रुपये भाडे मान्य केले. त्यामुळे मंडळाचे प्रत्येक महिन्यात ४३ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान होत आहे. या ठेकेदाराबरोबर झालेल्या पाच वर्षांच्या कराराप्रमाणे पीएमपीचे सुमारे २५ कोटी ९५ लाख रुपयांचे नुकसान पीएमपीएमएलला सोसावे लागणार आहे,’ असे संभूस यांनी सांगितले.

‘शहरात ३५० हून अधिक बसथांब्यांवर बेकायदा रोषणाई करण्यात आली आहे. यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि पथ विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाही. त्याचे शुल्कही भरण्यात आले नाही,’ असा आरोप संभूस यांनी करून याबाबत निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड म्हणाले,‘गेल्या दीड वर्षांपूर्वी ‘पीएमपी’च्या थांब्यांवर, आगारांवर जाहीरात करण्यासाठी निविदा काढण्यात आली. त्यानुसार संबंधित कंत्राटदाराने कामही सुरू केले. आता या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केल्याशिवाय निविदा रद्द करता येत नाही. कंत्राटदाराकडून काही चूक झाली असेल तर योग्य कारवाई करण्यात येईल. आवश्यक तिथे दंडही आकारण्यात येईल. त्यासाठी या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ही निविदा प्रक्रिया कशी झाली, याची माहिती घेण्यात येईल. त्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल.’