पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त पुण्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.स्वारगेट, मनपा, हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड या ठिकाणांवरून आळंदीकडे जाणाऱ्या १७९ बस आणि देहूकडे जाणाऱ्या ३१ बसेस ५ ते ९ जुलै या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याच कालावधीत देहू ते आळंदी अशा १५ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे.

पालखी प्रस्थानावेळी पहाटे अडीच वाजेपासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, मनपा या ठिकाणावरून आळंदीला जाणेकरिता जादा १८ बसेस सोडण्यात येणार असून, पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील बस स्थानकावरून नेहमीच्या मार्गावरील १५० बस आळंदीसाठी भोसरी, विश्रांतवाडीपर्यंत उपलब्ध राहणार आहेत. याशिवाय, किमान ४० प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

हडपसरमध्ये पालखी दर्शनासाठी दुपारी बारा ते एक दरम्यान थांबणार असल्याने, त्या वेळेत महात्मा गांधी स्थानक येथून पुणे स्टेशन, वारजे माळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी इत्यादी ठिकाणांसाठी बसेस देण्याची व्यवस्था करण्यात आली असून, कात्रज कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर व वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

दिवेघाट रस्ता वाहतुकीस बंद राहणार असल्याने या मार्गाची वाहतूक पर्यायी बोपदेव घाटमार्गे अशी सुरू ठेवण्यात येणार आहे. या गाड्यांचे संचलन स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर असे राहणार असून ६० जादा बस सोडण्यात येणार असल्याची माहिती ‘पीएमपी’कडून देण्यात आली.

पालखी सोहळ्यातील वाहनांची तांत्रिक तपासणी करुन घेण्याचे आवाहन

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात देहू, आळंदी ते पंढरपूर दरम्यान दोन्ही पालखी मार्गावर प्रवासी, जड वाहने मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. या वाहनांतील तांत्रिक दोषांमुळे अपघात होऊ नयेत, रस्त्यात बंद पडून ती वाहतूकीस अडथळा होऊ नये, याकरिता सर्व वाहनांची तपासणी प्रादेशिक परिवहन, पुणे कार्यालयाच्या आळंदी रोड चाचणी मैदान व दिवे येथील टेस्ट ट्रॅक येथील कार्यालयात वाहनांची तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे.

वाहन तपासणीवेळी नोंदणी प्रमाणपत्र, कर, विमा प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र व वायू प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र, अनुज्ञप्ती व वाहतूक परवाना मुदतीत असणे आवश्यकता आहे, ही तपासणी विनामुल्य करून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व वाहनधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.