पुणे : पीएमपीच्या पंधराव्या वर्धापनदिनानिमित्त पीएमपीकडून बस डे उपक्रमासह विविध कार्यक्रमांचे सोमवारी (१८ एप्रिल) आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने सवलतीच्या दरात सोमवारी सवलतीच्या दरात सेवा देण्यात येणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांना सक्षम, तत्पर आणि सुरक्षित वाहतूक सुविधा देण्यासाठी या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  बस डे निमित्त सोमवारी १ हजार ८०० गाडय़ा मार्गावर संचलनात राहणार आहेत. कोथरूड डेपो ते डेक्कन, स्वारगेट ते वडगांव धायरी फाटा, स्वारगेट ते शिवाजीनगर (बाजीराव, शिवाजी रस्ता मार्गे), जंगली महाराज रस्ता, फग्र्युसन महाविद्यालय रस्ता या पाच मार्गावर सलगपणे प्रवासी सेवा दिली जाईल. पीएमपीच्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (१९ एप्रिल) पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवासांसाठी सवलतीच्या दरात किमान तिकीट दर पाच रुपये आणि कमाल तिकीट दर दहा रुपये असा राहणार आहे. तसेच पुण्यदशम बससेवा पूर्ण दिवस मोफत राहणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड हद्दीबाहेरील चालू तिकीट दरात कोणताही बदल होणार नाही. बुधवारी (२० एप्रिल) महिला प्रवाशांसाठी सवलतीच्या दरात म्हणजे दहा रुपयांच्या दैनिक पासात संपूर्ण दिवस प्रवास करता येणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड हद्दीबाहेर मात्र कोणतीही सवलत राहणार नाही.

दरम्यान, बस डे उपक्रमाच्या दिवशी पीएमपी मार्फत देण्यात येणाऱ्या सेवा आणि सुविधांची माहिती होण्याच्या दृष्टीने बस प्रवाशांना पीएमपीकडून माहिती पत्रक दिले जाईल. त्यामध्ये लकी कूपन असेल. प्रवाशांनी कूपनमध्ये स्वत:चे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि पीएमपी सेवेबाबतचा अभिप्राय नमूद करायचा आहे. माहिती भरलेले कूपन प्रत्येक बस आणि बसस्थानकामध्ये ठेवलेल्या बॉक्समध्ये जमा करायचे आहे. त्यातून लकी ड्रॉ काढला जाईल. विजेत्या प्रवाशांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

दरम्यान, पीएमपी आगाराअंतर्गत क्रिकेट आणि कबड्डी स्पर्धा आणि बक्षीस वितरण, एक्झिबिशन ऑन व्हील्स हा उपक्रम, वाहतूक तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था, प्रवासी मंच, ज्येष्ठ नागरिक यांच्यासमवेत परिसंवाद आणि चर्चासत्राचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.