पुणे : पुणे शहरातील बसस्थानकांची झालेली दुरवस्था, ब्रेकडाऊन होणाऱ्या बसची वाढत असलेली संख्या, बसमध्ये आणि बस स्थानकांवर बेकायदा पद्धतीने लावल्या जाणाऱ्या जाहिराती, कर्मचाऱ्यांचे वर्षानुवर्षे न सुटणारे प्रश्न अशा विविध प्रश्नांवरून नगरसेवकांनी ‘पीएमपी’चे व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांना धारेवर धरले.

‘पीएमपीएमएल’च्या प्रश्नांवर शुक्रवारी पुणे महानगरपालिकेच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात चर्चा झाली. ही सभा सुमारे साडेदहा तास चालली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली सभा रात्री साडेनऊ वाजता संपली. या सभेत सदस्यांनी ‘पीएमपी’च्या तक्रारींचा पाढा वाचला. वाढती आर्थिक तूट, भाडेतत्त्वावरील भूखंडांची माहिती, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पेन्शन प्रस्तावांवर नगरसेवकांनी भूमिका मांडली.

‘‘पीएमपी’ प्रत्येक वर्षी तोट्यात कशी जाते, ही तूट भरून काढण्यासाठी दर वेळी महापालिकेलाच आर्थिक मदत का करावी लागते,’ अशी विचारणा नगरसेविका अनिता इंगळे यांनी केली. प्रभागामध्ये बस स्टॉपची उभारणी करावी, नांदेड सिटीसाठी बससेवा सुरू करण्याची मागणी इंगळे यांनी केली. कोंढवा-कौसरबाग येथील बसस्थानकाची दयनीय अवस्था झाल्याची तक्रार गफूर पठाण यांनी केली. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आणि नागरिकांच्या सोयीसाठी तातडीने आवश्यक कामे हाती घेण्याची मागणी केली.

नगरसेवक अपूर्व खाडे म्हणाले, ‘डेक्कन जिमखाना येथील भाऊसाहेब शिरोळे बसस्थानकाची आणि तेथील व्यावसायिक गाळ्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. ही बाब अनेकदा पीएमपी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. येथील अनेक गाळे बंद पडल्याने उत्पन्नावर परिणाम झाला असून, प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करून या ठिकाणाचे पुनरुज्जीवन करावे.’

‘पीएमपी’च्या भाडेतत्त्वावरील भूखंडांबाबत प्रशासनाकडून पारदर्शक माहिती दिली जात नाही, असा आरोप अश्विनी लांडगे यांनी केला. पीएमपी प्रशासनाने अनेक प्रस्ताव प्रलंबित ठेवले आहेत. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन प्रस्ताव रखडले आहेत. हे सर्व प्रस्ताव तातडीने मंजूर करून निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

सचिन मोरे, रूपाली धाडवे यांनी सभागृहात ‘पीएमपी’च्या कारभारावर उपरोधिक कविता केल्या. ‘महिलांना सुरक्षितता मिळत नाही. महिलांना आवश्यक स्वच्छतागृहे नाहीत,’ अशा व्यथा त्यांनी सभागृहात मांडल्या. स्वरदा बापट म्हणाल्या, ‘उपनगरांमधून येणाऱ्या बसच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. बस बंद पडतात, ठेकेदारांकडे सर्वांत जास्त बस चालविण्यासाठी दिल्या आहेत. नागरिकांच्या कष्टाचा पैसा आपण देतो. त्या बदल्यात प्रवाशांना सेवा मिळाली पाहिजे.’

हर्षवर्धन मानकर म्हणाले, ‘पीएमपीएमएलमध्ये झालेल्या घोटाळ्याचा चौकशी अहवाल तत्कालीन अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी तयार केला होता. तो सभागृहात मांडावा.’ दादा कोद्रे म्हणाले, ‘वाहतूक कोंडी वाढत आहे. पर्याय म्हणून बसने जास्तीच जास्त नागरिकांनी प्रवास केला पाहिजे. नगरसेवक, अधिकाऱ्यांनीदेखील महिन्यातून किमान एकदा बसने प्रवास केला पाहिजे.’

संचालकांकडून उत्पन्नवाढीचे उपाय

‘पीएमपी’च्या संचालक मंडळावर नगरसेवक अजय खेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वसाधारण सभेत पीएमपी मधील तक्रारींचा पाढा त्यांनी देखील वाचला. संचालक म्हणून पीएमपी मध्ये काम करताना काय उपाय करत आहोत, याची माहिती सभागृहात दिली. ‘काम करताना डोळ्यांसमोर उद्दिष्ट ठेवून काम केले पाहिजे. पर्यटनाच्या माध्यमातून बस सुरू केल्यामुळे उपन्नात वाढ झाली. करार संपलेल्या मिळकतींचे करार नव्याने केले. तूट का वाढली, याचा अभ्यास केला पाहिजे. पीएमपी मालकीच्या रिकाम्या जागा ताब्यात घ्यायच्या आहेत,’ असे ते म्हणाले.