पुणे : ‘पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) ही सार्वजनिक संस्था आहे. ही प्रवाशांच्या हितासाठी असली पाहिजे. ही कोणाच्या घरची खासगी संस्था नाही,’ अशा शब्दांत महापौर मंजूषा नागपुरे यांनी ‘पीएमपीएमएल’च्या प्रशासनाला सुनावले. ‘लोकप्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना हस्तक्षेप समजण्याची मानसिकता अधिकाऱ्यांनी बदलावी,’ असेही महापौरांनी सुनावले.

‘पीएमपी’वर पुणे महापालिकेत विशेष सर्वसाधारण सभा महापालिकेत झाली. ही सभा सुमारे साडेदहा तास चालली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली सभा रात्री साडेनऊ वाजता संपली. या सभेत सदस्यांनी ‘पीएमपी’च्या तक्रारींचा पाढा वाचला. नगरसेवकांनी ‘पीएमपी’च्या कारभारावर ताशेरे ओढून कारभार सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली.

महापौर नागपुरे यांनीही ‘पीएमपी’च्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आणि मनमानी कारभार बंद करण्यास सांगितले. महापौर म्हणाल्या, ‘नगरसेवकांनी स्वतः बस डेपोची पाहणी केली, बसमधून प्रवास केला आणि कर्मचारी, प्रवाशांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या. त्यामुळे नगरसेवकांच्या सूचना आणि तक्रारी योग्य असून, त्यांना गांभीर्याने घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.’

सभागृह नेते गणेश बिडकर यांनी ही प्रशासनावर जोरदार हल्ला चढविला. ‘पुणे महापालिका ही ‘पीएमपीएमएल’ची ६० टक्के भागधारक आहे. त्यामुळे हे सभागृहच सर्वोच्च असून, लोकप्रतिनिधींना डावलून कारभार चालणार नाही,’ असे बिडकर म्हणाले. नवीन बस खरेदीपूर्वी डेपो, पार्किंग, चार्जिंग स्टेशन, चालक-वाहक भरती आणि सविस्तर डीपीआर तयार करण्याची मागणी केली. कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, पेन्शन, आरोग्य सुविधा, २० ते २५ निविदांतील कथित अनियमिततेची चौकशी आणि मेट्रो स्थानकांना जोडणारी फीडर बस सेवा सुरू करण्याचीही मागणी केली.

‘सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जनसेवेसाठी’ पीएमपी प्रशासनाचा खुलासा

सर्वसाधारण सभेत सदस्यांनी उपस्थित केलेल्या आरोपांना अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही नफा कमावण्यासाठी नव्हे, तर जनसेवेसाठी चालवली जाते.

देशातील इतर शहरांतील स्थानिक वाहतूक व्यवस्थेच्या तुलनेत पुण्याची बसव्यवस्था अधिक चांगली आहे. गेल्या चार वर्षांत महामंडळाच्या उत्पन्नात १२० टक्क्यांनी वाढ झाली असून, खर्चावरही नियंत्रण ठेवण्यात यश आले आहे. जागतिक मानकांनुसार दर एक लाख लोकसंख्येमागे ६० बसची आवश्यकता असते. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये मिळून सुमारे १ कोटी ३० लाख लोकसंख्येसाठी सुमारे ६ हजार बसांची गरज आहे. मात्र, सध्या ‘पीएमपी’कडे केवळ १,९६४ बसचा ताफा आहे. त्यामध्ये १,३०६ कंत्राटी (सीएनजी व इलेक्ट्रिक) आणि ६५८ स्वतःच्या बसांचा समावेश आहे. केंद्र सरकारकडून लवकरच एक हजार नवीन इलेक्ट्रिक बस मिळणार असून, या वर्षी आणखी एक हजार सीएनजी बस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.’

‘पीएमपीमध्ये ब्रेकडाऊन ची संख्या वाढली आहे, ही वस्तुस्थिती आहे. प्रवासीसंख्या देखील कमी झाली आहे. मेट्रो सुरू झाल्याने ही संख्या त्याकडे वळली आहे. कर्मचाऱ्यांसाठीदेखील आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देण्याची प्रशासनाची तयारी आहे,’ असे ते म्हणाले.